मुंबई : हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कृती आवश्यक असून मुंबई क्लायमेट वीक हा त्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हवामान बदलावरील कृती कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हवामान कृती ही केवळ पर्यावरणीय जबाबदारी नसून भविष्यातील आर्थिक स्पर्धात्मकतेची किल्ली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई क्लायमेट वीकचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, मुंबईसारख्या किनारी महानगराला हवामान बदलाचा फटका बसत आहे. अतिवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे, घरे पाण्याखाली जाणे, व्यवसाय ठप्प होणे आणि उपजीविकेवर परिणाम होणे ही परिस्थिती वारंवार दिसत आहे. उष्णतेच्या लाटांचा परिणाम बांधकाम कामगार, फेरीवाले आणि शेतकरी यांच्यावर होत आहे. ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे कापणी केलेली पिके नष्ट होतात. त्याचा मोठा आर्थिक व सामाजिक परिणाम होतो. त्यामुळे हवामान बदल हा आज प्रशासनासमोरील गंभीर प्रश्न बनला आहे.
भारताने आर्थिक विकास आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समतोल साधण्याचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. देशाने अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली असून स्वच्छ ऊर्जेच्या विस्तारामुळे भारत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. महाराष्ट्रही या परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा क्षमता उभारण्यात आली असून २०३० पर्यंत हरित ऊर्जेचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी इलेक्ट्रिक वाहतूक, जैवइंधन, शाश्वत पायाभूत सुविधांवर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
हवामान कृतीसाठी युवकांचा सहभाग महत्त्वाचा - पंकजा मुंडे
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, हवामान कृतीसाठी शासन, शहर संस्था आणि नागरिक यांची भागीदारी आवश्यक असून युवकांचा सहभाग विशेष महत्त्वाचा आहे. समुदाय जनजागृती, हवामान साक्षरता आणि युवक उपक्रमांद्वारे शाश्वत महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध देशांतील प्रतिनिधी या मंचावर एकत्र येत असून, जागतिक सहकार्य आणि व्यवहार्य भागीदारीतूनच हवामान कृती यशस्वी होईल. भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करणे हीच आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. “संपूर्ण जग एक कुटुंब आहे” ही आपल्या संस्कृतीची भावना हवामान कृती ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करते. एका प्रदेशावर होणारा परिणाम अखेरीस सर्वांवर होतो.
महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईसमोर उभे असलेले हवामान आव्हान गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. वाढते शहरी तापमान, अतिवृष्टी, पूरस्थिती, किनारपट्टीवरील ताण आणि वायू गुणवत्तेवरील दबाव या गंभीर बाबी आहेत.
ग्रामीण महाराष्ट्रातही अनपेक्षित दुष्काळ व पूर यांचा फटका बसत असून या पार्श्वभूमीवर मुंबई क्लायमेट वीकची संकल्पना हा उपक्रम केवळ चर्चेसाठी नसून प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि वित्तपुरवठ्याच्या मार्गांना चालना देण्यासाठी आहे. सर्वांनी या मंचातील चर्चांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून व्यवहार्य उपाय सुचवावेत, असे आवाहन मुंडे यांनी केले. महाराष्ट्र औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि विकासाच्या आघाडीवर असताना हवामान संवेदनशील विकासाची दिशा स्वीकारत असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.