मुंबई : कोस्टल रोडच्या उत्तरवाहिनी बोगद्यात कारला आग लागल्यानंतर महापालिकेने बोगद्यातील आपत्कालीन सुरक्षा व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्कालीन परिस्थितीत वाहनचालकांना आणि प्रवाशांना जवळच्या आपत्कालीन मार्गापर्यंत सहज पोहोचता येण्यासाठी दोन्ही बोगद्यांमध्ये १६ नवीन बहुभाषिक दिशादर्शक फलक बसविण्यात येणार आहेत.
नव्याने बसवण्यात येणाऱ्या फलकांवर जवळच्या क्रॉस पॅसेजपर्यंतचे अंतर आणि दिशा स्पष्टपणे दर्शविण्यात येईल. तसेच आपत्कालीन दरवाजा कसा उघडायचा, 'पॅनिक बटण'चा वापर कसा करायचा, शेजारच्या बोगद्यातून सुरक्षित बाहेर कसे पडायचे, याबाबत सोप्या भाषेत सूचना असतील. मुंबई अग्निशमन दलासह अन्य आपत्कालीन संपर्क क्रमांकही या फलकांवर नमूद करण्यात येणार आहेत. सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या या जुळ्या बोगद्यांमध्ये एकूण १० क्रॉस पॅसेज आहेत. त्यापैकी आठ पादचाऱ्यांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी, तर दोन आपत्कालीन सेवा वाहनांसाठी राखीव आहेत. प्रत्येक सुमारे ३०० मीटर अंतरावर पादचारी क्रॉस पॅसेज उपलब्ध आहेत.
आग किंवा अन्य दुर्घटना घडल्यास वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवून इंजिन बंद करावे, चावी वाहनातच ठेवून तातडीने बाहेर पडावे. कोणत्याही परिस्थितीत बोगद्यात यू-टर्न घेऊ नये किंवा वाहन रिव्हर्स करू नये, कारण त्यामुळे बचावकार्याला अडथळा निर्माण होऊ शकतो. बोगद्यात प्रत्येक १०० मीटरवर आपत्कालीन दूरध्वनी, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली , सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन प्रकाश व्यवस्था आणि केंद्रीकृत नियंत्रण कक्षाची सुविधा उपलब्ध आहे.
या घटनेत निर्धारित कार्यपद्धतीनुसार (एसओपी) तातडीने कारवाई करण्यात आली. मात्र भविष्यात अशा प्रसंगी वाहनचालकांना अधिक वेगाने सुरक्षित मार्ग सापडावा, यासाठी अतिरिक्त दिशादर्शक फलक बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
म्हणून ‘साकार्डो व्हेंटिलेशन’ प्रणाली!
कोस्टल रोड बोगद्याची अग्निसुरक्षा रचना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात आली असून ती साकार्डो व्हेंटिलेशन प्रणाली, अग्निशमन हायड्रंट आणि अग्निरोधक संरचनेवर आधारित आहे. हा बोगदा १०० मेगावॉट क्षमतेच्या आगीचा सलग चार तास सामना करू शकेल, अशा पद्धतीने बांधण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी आणि अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.