

श्रेया जाचक/मुंबई
राज्यातील नामांकित कोचिंग संस्था असलेल्या एमटी एज्युकेअर लिमिटेडने (महेश ट्युटोरियल्स) कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईतील आपल्या ३३ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या अचानक लागलेल्या कुलूपामुळे हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या ट्युटोरियल्समध्ये ८०० हून अधिक विद्यार्थी शिकत असून, त्यांनी संपूर्ण शैक्षणिक वर्षाची फी आधीच भरली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन पालकांनी आता राज्य सरकारला यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
महेश ट्युटोरियल्स ३८ वर्षांपासून कार्यरत आहे. मात्र, नुकत्याच त्यांच्या अनेक शाखा अचानक बंद करण्यात आल्या. ७ जुलै २०२६ रोजी सर्व शाखाप्रमुखांची एक तातडीची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर, व्यवस्थापनाने १० जुलैपासून राज्यातील सर्व शाखांमधील कामकाज त्वरित थांबवण्याचा निर्णय जाहीर केला. यापूर्वी, संस्थेने पालकांकडून २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी संपूर्ण प्रवेश शुल्क (फी) वसूल केले होते.
पालकांनी सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था करण्यात आली नाही, तसेच फी परताव्याबाबतही स्पष्ट घोषणा केली नाही. परिणामी, हजारो कुटुंबांना आर्थिक आणि मानसिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
या क्लासेसने राज्यभरात कार्यरत असलेल्या अनेक शाखा बंद केल्या होत्या. शहरात महसूल मिळवून देणाऱ्या शाखा त्यांनी सुरू ठेवल्या होत्या, तरीही त्यांना तोटा होत राहिला. क्लासेसने विद्यार्थ्यांना ९वी आणि १०वीची एकत्रित (कॉम्बो) ऑफर दिली होती आणि दिवाळखोरी जाहीर झाल्यानंतरही आपले कामकाज सुरू ठेवले होते," असे ‘महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन’चे अध्यक्ष प्रजेश ट्रॉटस्की यांनी सांगितले.
या निर्णयाचा थेट फटका महाराष्ट्र राज्य मंडळाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या ८०० हून अधिक विद्यार्थ्यांना, सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांना, शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि हजारो पालकांना बसला आहे.
१०वी आणि १२वी ही शैक्षणिक वर्षातील अत्यंत महत्त्वाची वर्षे असल्याने, या टप्प्यावर क्लासेस अचानक बंद झाल्यामुळे अभ्यासाच्या वेळापत्रकात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. परीक्षेची तयारी, मानसिक स्वास्थ्य, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि भविष्यातील शैक्षणिक संधींवर होणाऱ्या गंभीर परिणामांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
पालकांच्या तोंडचे पाणी पळाले
पालकांनी आपल्या बचतीचा वापर करून, कर्ज काढून किंवा इतर आर्थिक तजवीज करून प्रवेश फी भरली होती. मात्र, क्लासेस अचानक बंद झाल्यामुळे केवळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणातच अडथळा निर्माण झाला नाही, तर पालकांचा आर्थिक आत्मविश्वासही खचला आहे,’ असे 'संस्कृती जीवन आधार फाऊंडेशन'चे अध्यक्ष प्रदीप मगर यांनी सांगितले.
शिक्षकांनी सांगितले की, त्यांचे वेतन तीन महिन्यांहून अधिक काळ रोखून धरले आहे आणि गेल्या सुमारे दोन वर्षांपासून मानधन अनियमितपणे दिले जात आहे.
महेश ट्युटोरियल्सच्या शाखा अचानक बंद झाल्याच्या प्रकरणावर फाऊंडेशनने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन सादर करून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.