मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात जुलै महिन्यातच पावसाने दमदार बॅटिंग केल्याने पाणीसाठा ८८.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी बरसत असल्याने पाणीसाठा ८८ टक्क्यांच्या अवतीभोवती आहे. त्यात एल निनोचा प्रभाव असल्याने ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात तुरळक सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणांत ३० जुलै रोजी १२ लाख ८० हजार ७८६ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
मात्र एल निनोचा प्रभाव असल्याने पाऊस कमीच बरसणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १०० टक्के होत नाही तोपर्यंत १० टक्के पाणीकपात लागूच असणार आहे, असे मुंबई महापालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले.
एल निनोचा प्रभाव असला तरी तुरळक सरींमुळे सातही धरणक्षेत्रातील पाणीसाठा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत १०० टक्के होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीसंकट ऑगस्ट महिन्यातच संपुष्टात येईल, अशी चिन्हे आहेत.
३० जुलै रोजी पाणीसाठा (द. लि.)
अप्पर वैतरणा - १,८०,९५६
मोडकसागर - १,२८,९२५
तानसा - १,४३,००४
मध्य वैतरणा - १, ७०,९२७
भातसा - ६,२१,२५७
विहार - २७,६९८
तुळशी - ८,०१९
धरणक्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस (मिमी)
अप्पर वैतरणा - ४२.०० मिमी
मोडकसागर - १८.०० मिमी
तानसा - २.०० मिमी
मध्य वैतरणा - २४.०० मिमी
भातसा - २३. ०० मिमी
विहार - २.०० मिमी
तुळशी - ०.०० मिमी
लवकरच १०० टक्के
सातपैकी चार धरणे ओव्हरफ्लो झाली असून उर्वरित तीन धरणेही लवकरच तुडुंब भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सर्व धरणे १०० टक्के भरतील, अशी शक्यता आहे.
चार दिवसांतील पाणीसाठा (टक्क्यात)
३० जुलै २०२६ - ८८.४९
२९ जुलै २०२६ - ८८.१७
२८ जुलै २०२६ - ८८.८१
२७ जुलै २०२६ - ८८.४०