धरणक्षेत्रात पावसाची 'टी-२०'! २४ तासांत पाणीसाठ्यात १२.४४ टक्क्यांनी वाढ; राखीव उपशाला ब्रेक, तुळशी तलावही ओव्हरफ्लो! प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

धरणक्षेत्रात पावसाची 'टी-२०'! २४ तासांत पाणीसाठ्यात १२.४४ टक्क्यांनी वाढ; राखीव उपशाला ब्रेक, तुळशी तलावही ओव्हरफ्लो!

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात पावसाने ‘टी-२०’ खेळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून गेल्या २४ तासांत तब्बल १२.४४ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ४१.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात पावसाने ‘टी-२०’ खेळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून गेल्या २४ तासांत तब्बल १२.४४ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ४१.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

धरणक्षेत्रात सतत बरसणाऱ्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत असली तरी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात एल निनोचा प्रभाव अधिक असणार आहे. त्यामुळे धरणक्षेत्रात किती पाऊस बरसतो, हे सांगणे कठीण असल्याने चिंता कायम आहे. दरम्यान, अप्पर वैतरणातून राखीव पाणीसाठा २२ जूनपासून घेण्यास सुरुवात केली होती. मात्र धरणक्षेत्रात बरसत असलेल्या पावसामुळे ६ जुलैपासून राखीव पाणीसाठा घेणे बंद केले आहे.

मुंबई व परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंगला सुरुवात केली आहे. त्यामुळे ६ टक्क्यांपर्यंत घसरलेल्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे पालघर, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात येत असून तिन्ही जिल्ह्यांत सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. धरणक्षेत्रात असाच पाऊस बरसत राहिला तर धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.

मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणात ८ जुलै रोजी ५ लाख ९८ हजार ५८९ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे. धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू राहिली तर मुंबईवरील पाणी कपातीचे संकट दूर होईल, असा विश्वास आहे.

८ जुलै रोजी पाणीसाठा (टक्के)

  • अप्पर वैतरणा - २०.६६

  • मोडक सागर - ७२.१४

  • तानसा - ६९.३५

  • मध्य वैतरणा - ३४.६८

  • भातसा - ३५.५९

  • विहार - १००

  • तुळशी - १००

धरण क्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस (मिमी)

  • अप्पर वैतरणा - ३०९.० मिमी

  • मोडक सागर - २५१.० मिमी

  • तानसा - ३१९.० मिमी

  • मध्य वैतरणा - १७४.० मिमी

  • भातसा - २००.० मिमी

  • विहार - ७७.० मिमी

  • तुळशी - १२२.० मिमी

तुळशी तलावही ओव्हरफ्लो!

विहार तलावापाठोपाठ तुळशी तलावही मंगळवारी रात्री ११.४३ वाजता ओव्हरफ्लो झाला. मुंबईत होत असलेल्या दमदार पावसामुळे मंगळवारी ७ जुलैच्या रात्री ९ वाजता ‘विहार’ तलाव ओसंडून वाहू लागला आणि त्यापाठोपाठ लगेचच रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी ‘तुळशी’ तलावदेखील पूर्णपणे भरला. तुळशी तलाव हा गेल्या वर्षी १६ ऑगस्ट २०२५ रोजी भरून वाहू लागला होता. तर २०२४ मध्ये हा तलाव ४ ऑगस्ट रोजी भरून वाहू लागला होता. ८०४.६ कोटी लीटर उपयुक्‍त जलधारणा क्षमता या तलावाची आहे.

तुळशी तलावाचे वैशिष्ट्य

  • मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर (सुमारे २२ मैल) अंतरावर हा तलाव आहे.

  • या कृत्रिम तलावाचे बांधकाम १८७९ मध्ये पूर्ण झाले.

  • या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च त्यावेळी आला होता.

  • या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते.

  • तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर एवढा असतो. (८०४६ दशलक्ष लीटर)

  • तुळशी तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहणारे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गुंतवणूकदारांचे एका दिवसात ८.९६ लाख कोटी बुडाले; अमेरिका-इराणमधील वाढत्या तणावाने शेअर बाजारात घसरण

आदिवासींना मिळणार हक्काचा सातबारा; वनपट्टाधारकांसाठी 'नमुना ७ ई आणि १२ ई' लागू

आयसिसच्या नेटवर्कवर ‘एनआयए’चे छापे

मुंबईच्या पुरमुक्तीसाठी १३ हजार कोटींची योजना; केंद्राकडे प्रस्ताव सादर, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Mumbai : ३,५०० इमारतींना ओसी मिळणार; स्थायी समितीत एकमताने प्रस्ताव मंजूर