'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

आता रखडलेल्या भूखंडांचाही होणार विकास; लाखो मुंबईकरांना दिलासा; DCPR मध्ये चिंचोळ्या गल्लीतील भूखंडांचाही समावेश

मुंबईतील चिंचोळ्या गल्ल्यांमधील (९ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते) रखडलेल्या भूखंडांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने अशा भूखंडांचा समावेश आता 'DCPR' मध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 'फायर एनओसी' मिळण्यातील अडथळे दूर होऊन हजारो जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येईल आणि लाखो मुंबईकरांना हक्काचे घर मिळेल.

गिरीश चित्रे

मुंबई : मुंबईत चिंचोळ्या गल्लीत अनेक भूखंड असून त्या भूखंडांचा भाग ९ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या पोहोच रस्त्याला जोडला गेलेला असल्याने त्या भूखंडांचा विकास करणे शक्य होत नाही. आता विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत (डीसीपीआर) अशा भूखंडांचा समावेश करण्यात येणार आहे. 'डीसीपीआर' मध्ये समावेश झाल्यानंतर या भूखंडांना 'फायर एनओसी' मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून या रखडलेल्या भूखंडांचा विकास होऊन लाखो मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील अनेक भूखंड केवळ पोहोच रस्ता ९ मीटरपेक्षा कमी रुंदीचा असल्याने वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिले आहेत. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये प्रस्तावित बदलामुळे आता अशा भूखंडांचा विकास होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. विशेषतः जुन्या वसाहती, वस्ती आणि अरुंद गल्ल्यांमधील मालमत्ताधारकांना याचा थेट फायदा होणार आहे. या बदलामुळे सर्वात महत्त्वाचा अडसर ठरणारा फायर विभागाचा ना हरकत दाखला (फायर एनओसी) मिळविणे सोपे होणार आहे. यापूर्वी अग्निशमन वाहनांना पोहोचण्यासाठी किमान ९ मीटर रस्ता आवश्यक असल्याने अनेक प्रस्ताव नाकारले जात होते. मात्र, आता नियोजनबद्ध अटी व पर्यायी सुरक्षा उपायांसह मंजुरीचा मार्ग खुला होणार आहे.

जीर्ण इमारतीतील नागरिकांना मिळतील सुसज्ज घरे

याचा फायदा केवळ भूखंड मालकांनाच नाही, तर जुन्या, जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही होणार आहे. पुनर्विकासाच्या संधी वाढल्याने सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक घरे उपलब्ध होतील. तसेच शहरातील बेकायदा बांधकामांना आळा बसणार असून नियोजित विकासाला चालना मिळणार आहे.

गेल्या काही वर्षांत मुंबईचा विकास झपाट्याने होत आहे. मात्र ९ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या पोहोच रस्त्याला जोडणाऱ्या भूखंडांचा विकास रखडलेलाच आहे. भूखंडांची जागा मोठी पण भूखंडाचा रस्ता अरुंद ९ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्याला जोडला गेला असेल, अशा भूखंडाचा विकास रखडला आहे. आता अशा भूखंडांचा विकास करण्यासाठी त्यांचा 'डीसीपीआर' मध्ये समावेश करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेचा प्रस्ताव

मुंबई महापालिकेने याबाबत प्रस्ताव तयार केला असून सुधार समितीच्या मंजुरीनंतर सभागृहात तो मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. नगरविकास विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर अशा भूखंडांचा विकास होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड