प्रातिनिधिक छायाचित्र 
मुंबई

देवनारचा कचरा-ऊर्जा प्रकल्प धोकादायक; कर्करोगजन्य प्रदूषणाचा धोका असल्याचा तज्ज्ञांचा इशारा

देवनार डम्पिंग ग्राउंडवरील नऊ एकर जागेवर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारण्यात येत असून, त्याचे जवळपास ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. मात्र, कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पात कचरा जाळताना डायऑक्सिन्स आणि फ्युरान्स सारखी कर्करोगजन्य रसायने उत्सर्जित होतात.

Swapnil S

मुंबई : देवनार क्षेपणभूमी येथे वेस्ट-टू-एनर्जी (कचऱ्यातून वीजनिर्मिती) प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास तसेच पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. तसेच देवनार परिसरात असा प्रकल्प उभारल्यास कर्करोगजन्य प्रदूषकांच्या प्रमाणात मोठी वाढ होऊ शकते, त्यामुळे हा प्रकल्प वेळेत थांबवण्यात यावा. अन्यथा अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पर्यावरणतज्ज्ञ, वैद्यकीय विशेषज्ञ आणि नागरी संस्थांनी मुंबई महापालिकेला दिला आहे.

देवनार डम्पिंग ग्राउंडवरील नऊ एकर जागेवर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारण्यात येत असून, त्याचे जवळपास ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. मात्र, कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पात कचरा जाळताना डायऑक्सिन्स आणि फ्युरान्स सारखी कर्करोगजन्य रसायने उत्सर्जित होतात.

मुंबईमध्ये कचऱ्याचे विभाजन करून विल्हेवाट लावण्याची पद्धत अपुरी असल्याने प्लास्टिक, रबर, बॅटऱ्या, इलेक्ट्रॉनिक कचरा यांसारख्या पदार्थांच्या एकत्रित ज्वलनामुळे भारी धातू आणि घातक वायूंचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे.

देवनार डम्पिंग ग्राऊंड परिसर अतिप्रदूषित ठिकाण म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी असलेला कचरा डेपो, वारंवार लागणाऱ्या आगीचे जास्त प्रमाण जास्त असल्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना श्वसनाचे विकार होऊ लागले आहेत. अशा स्थितीत वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प उभारल्यास गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द आणि बैगनवाडीसारख्या अधिक लोकवस्ती असलेल्या भागांतील नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. असे मत नागरिक मंचाच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.

तसेच वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून निर्माण होणारी अतिशय बारीक राख अत्यंत विषारी असून त्यामध्ये लेड, पारा, कॅडमियम, आर्सेनिक, डायऑक्सिन्स असे धातू असतात. या राखेपासून देवनारकरांचे संरक्षण करणे अत्यंत कठीण आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

जगभरातील अनेक प्रकल्प बंद

दरम्यान, जगभरातील अनेक देशांनी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प महाग, प्रदूषणकारक आणि आरोग्यास घातक असल्याने बंद केले आहेत. त्याऐवजी शून्य कचरा, पुनर्वापर आणि कंपोस्टिंग या पर्यायांकडे वळण्याची शिफारस पर्यावरण क्षेत्रातील संस्थांकडून करण्यात येत आहे. तर देवनार येथील प्रस्तावित प्रकल्प तत्काळ रद्द करून सुरक्षित आणि टिकाऊ कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने पावले उचलावीत, अशी मागणी गोवंडी सिटिझन्स वेल्फेअर फोरम आणि पर्यावरण संघटनांकडून होत आहे.

‘ओंकार’ला गुजरातमध्ये स्थलांतरित करण्याला विरोध; वन्यजीव धोरणात फेरबदल करण्याची मागणी

ठाण्यात पुन्हा कचराकोंडी; डायघरमध्ये कचरा टाकण्यास रहिवाशांचा विरोध

छोटे भूखंड आता ‘विनाशुल्क’ नियमित; सातबारावर नाव, ३ कोटींहून अधिक नागरिकांना लाभ; महसूल विभागाची नियमावली जारी

Mumbai : ट्रॅफिकपासून दिलासा मिळणार; टिळक पुलावरील वाहतूककोंडी संपणार

उल्हासनगर : ‘बागेश्वर धामचा प्रसाद’ म्हणत गुंगी देऊन फसवणूक, पाच जणांना अटक; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त