मुंबई : मुंबई महापालिकेसह विविध प्राधिकरणांचे विविध प्रकल्प तसेच खासगी पुनर्विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तब्बल १,४४३ झाडे बाधित होणार असून त्यापैकी ९०२ झाडे थेट तोडली जाणार आहेत, तर ५४१ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत लवकरच सादर करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणासमोर विविध प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या झाडांबाबतचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह कोस्टल रोड जोडरस्ता, इस्टर्न फ्री वे ते मरिन ड्राइव्ह भूमिगत रस्ता, अंधेरी विमानतळ परिसरातील बांधकाम, आयआयटी पवई पुनर्विकास, बीएआरसी जोडरस्ता, हिरानंदानी परिसरातील एसआरए प्रकल्प, कांदिवली चारकोप सबस्टेशन, बोरिवली, घाटकोपर, पोईसर, मलबार हिल आणि मागाठाणे येथील पुनर्विकास प्रकल्प अशा अनेक महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
या वृक्षतोडीच्या बदल्यात २१,६२५ झाडे लावली जाणार असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात लावण्यात आलेल्या झाडांपैकी किती जगतात, त्यांची योग्य काळजी घेतली जाते का? आणि त्यांचे अस्तित्व पुढे किती काळ टिकते, हे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.
कत्तल मुंबईत, लागवड पालघरमध्ये
मुंबईतील वृक्षतोडीची भरपाई म्हणून २१ हजारांहून अधिक झाडे लावण्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र, यातील काही झाडे मुंबईबाहेरील पालघर जिल्ह्यात लावण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील पर्यावरणाची हानी भरून काढण्यासाठी मुंबईबाहेर झाडे लावण्याचा निर्णय कितपत योग्य, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.