मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पात ८ हजार झाडे बाधित होणार असून मंगळवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पात जी झाडे बाधित झाल्यानंतर नवीन झाडांची लागवड करण्यात येणार आहे, त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन झाडांचे पुनर्रोपण केले याची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या २६ वॉर्डात मॅक लिफ्टन मशीन उपलब्ध करून दिल्यास झाडांची छाटणी योग्यप्रकारे करता येईल, अशी माहिती वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सभागृह नेते गणेश खणकर यांनी दिली.
धारावी पुनर्विकास प्रकल्पास मरीन लाइन्स-ऑरेंज गेट बोगदा, पवई, कांदिवली, घाटकोपर आदी महत्त्वाच्या विकास प्रकल्पांसाठी अडथळा ठरणाऱ्या एकूण २,७१० झाडे तोडण्यास व पुनर्रोपण करण्यास मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मंगळवारी मंजुरी दिली. तसेच पवई येथील हिरानंदानी एसआरए प्रकल्पातून महापालिकेला प्रकल्पग्रस्तांसाठी (पीएपी) ४ हजार घरे उपलब्ध करून देण्यास विकासकाने सहमती दर्शविली आहे.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. धारावी पुनर्विकास प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या १,६९३ झाडांपैकी ८७१ झाडे तोडण्यास, तर ८२२ झाडांचे पुनर्रोपण करण्यास परवानगी देण्यात आली.
२४ वारसा वृक्षांवरही कुऱ्हाड
मंजुरीसाठी सादर करण्यात आलेल्या झाडांमध्ये ५० ते ८५ वर्षे वयाचे २५ वारसा (हेरिटेज) वृक्ष आहेत. त्यापैकी २४ वारसा वृक्ष तोडण्यास, तर एक वारसा वृक्षाचे स्थलांतर (ट्रान्सप्लांटेशन) करण्यास परवानगी देण्यात आली.
भाजपचे महापालिका गटनेते गणेश खणकर यांनी ज्या प्रजातीची झाडे तोडली जातील, त्याच प्रजातीची झाडे पुन्हा लावावीत, अशी सूचना केली. वृक्ष प्राधिकरणाने ही सूचना मान्य केली असून, मंजुरी मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत किमान सहा फूट उंचीची देशी प्रजातीची रोपे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे वृक्षारोपण पालघर जिल्ह्यातील चहाडे गावातील ९० एकर जागेवर करण्यात येणार असून, त्यासाठी संबंधित जमीनमालकाची ना-हरकत (एनओसी) घेण्यात आली आहे. वृक्ष प्राधिकरणाचे सदस्यही या वृक्षारोपणाची पाहणी करणार आहेत.
वृक्ष समितीत युवा व महिला सदस्यांचा समावेश
बैठकीत वृक्ष समितीमध्ये वृक्षतज्ज्ञांसोबत एक युवा प्रतिनिधी आणि एका महिला सदस्याचा समावेश करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. यामुळे समितीत विविध क्षेत्रांतील प्रतिनिधित्व वाढणार आहे.
मेट्रो मार्गाखाली बांबू लागवडीचा निर्णय
मुंबईतील वाढत्या मेट्रो जाळ्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मेट्रो मार्गाखाली बांबूची लागवड करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय वृक्ष प्राधिकरणाने घेतला.