मुंबई : फटाके फोडण्यावर निर्बंध आणि सुरक्षिततेबाबत वारंवार जनजागृती करूनही फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. ६ व ७ नोव्हेंबर रोजी मुंबईत आगीच्या तब्बल ८९ घटना घडल्याची नोंद अग्निशमन दलाकडे झाली आहे. यापैकी २८ आगीच्या घटना फटाक्यांमुळे घडल्याची माहिती उपलब्ध आकडेवारीतून समोर येते. या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
दिवाळी सण म्हटले की फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांत वायू प्रदूषणात वाढ होत असल्याने देशभरात फटाके फोडण्यावर निर्बंध घातले जात आहेत. मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, गल्ल्या व फुटपाथवर फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. उच्च न्यायालयाने फटाके फोडू नका, असे आदेश देताच मुंबई महापालिकेनेही फटाके फोडू नका असे आवाहन मुंबईकरांना केले आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण नियंत्रण तसेच आरोग्यविषयक दुष्परिणामाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी.
स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संदेश द्यावा. तसेच, सर्व शासकीय आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी उपक्रम राबवावेत. प्रदूषण करणारे फटाके फोडण्याऐवजी हरित फटाक्यांचा (Green firecrackers) वापर करावा, अशा सूचना पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नुकत्याच दिल्या. मात्र मुंबईत फटाक्यांची आतषबाजी सुरू असून मुंबईत दिवाळी सणादरम्यान लागणार आगीच्या घटनांमध्ये फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
अशा घडल्या घटना!
६ नोव्हेंबर रोजी मुंबईत आगीच्या ३३ घटना घडल्या. त्यापैकी १२ घटना फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या होत्या. ७ नोव्हेंबर रोजी आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊन हा आकडा ५६ वर पोहोचला. यापैकी १६ घटना फटाक्यांमुळे घडल्या. म्हणजेच दोन दिवसांतच आगीच्या ८९ घटनांची नोंद झाली असून २८ घटनांचा संबंध फटाक्यांशी आहे.
उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश
रस्त्यांवर बंदी: सार्वजनिक रस्ते, गल्लीबोळ आणि पदपथांवर फटाके फोडण्यास पूर्ण बंदी.
वर्षभर निर्बंध: ही बंदी केवळ गणेशोत्सव किंवा दिवाळीपुरती मर्यादित नसून वर्षभर आणि सर्व सणांसाठी लागू.
ध्वनी व वायुप्रदूषण: ध्वनी आणि वायुप्रदूषण निर्माण करणाऱ्या फटाक्यांचा वापर टाळण्याचे नागरिकांना आवाहन.
जनजागृती: शाळा, रेल्वे, बस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे निर्देश.
हिरवे फटाके: कमी प्रदूषण करणाऱ्या आणि प्रमाणित ग्रीन फटाक्यांना प्रोत्साहन देण्यास सांगितले.