मुंबई : पुढील दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने मिठी नदीसह लहान मोठ्या नाल्यातील गाळ उपसा करण्यावर भर दिला आहे. ३१ मे पर्यंत नालेसफाईचे काम १०० टक्के पूर्ण होईल, याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणी गाळ काढण्यावर लक्ष केंद्रित करा, असे निर्देश मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी संबंधित विभागाला दिले.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईतील नाले आणि नद्या यातून गाळ उपसा करून स्वच्छ करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील नाला स्वच्छतेबरोबरच मिठी नदीवर सुरू असलेल्या तीन पॅकेज अंतर्गत सहा ठिकाणी कामांची सुरुवात झाली आहे.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए कार्यालयाजवळील जेतवन उद्यान येथे मिठी नदी, वरळीतील (जी दक्षिण) नेहरू विज्ञान केंद्र नाला, दादर धारावी नाला (जी उत्तर) येथे सुरू असलेल्या स्वच्छता कामांची बुधवारी पाहणी केली. यावेळी उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) कल्पना राऊळ, उप प्रमुख अभियंता संजय इंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.
परिस्थिती गांभीर्याने हाताळा
वरळीतील (जी दक्षिण विभाग) नेहरू विज्ञान केंद्र नाल्यातून गाळ काढण्याचे काम कधी सुरू झाले आणि कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, याची माहिती आयुक्तांनी घेतली. त्याचबरोबर नाल्याच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्रात ज्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते, अशा ठिकाणांना नजरेसमोर ठेवून त्याच्या आजूबाजूचा परिसरातील कचरा तसेच किंवा नाल्यामधील गाळ प्राधान्याने काढला जाईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना भिडे यांनी केल्या. तसेच संपूर्ण शहर विभागातील मोठ्या पर्जन्य जलवाहिन्यांवरील मनुष्य प्रवेशिका किंवा ढापे यांची सद्यस्थिती गांभीर्याने तपासून पाहावी. ज्या ठिकाणी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत, त्या जाळ्या सुस्थितीत आहेत, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. वरळी नाका तसेच संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) परिसरामध्ये पाणी साचण्याची सखल ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी मेट्रो तसेच रस्ते विभाग यांच्या समन्वयाने जलवाहिनीला संलग्न असणाऱ्या जोडण्या सुस्थितीत राहतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
गुणवत्तेबाबत आग्रही राहा!
मिठी नदीच्या तीनही पॅकेजमध्ये नालेस्वच्छतेची सहा ठिकाणी कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामांची पॅकेजनिहाय माहिती भिडे यांनी घेतली. पॅकेजनिहाय उर्वरित कालावधीचे नियोजन, किती वाहने तसेच यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली आहे, कामाची गती वाढवण्यासाठी आवश्यक त्या बाबी कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. मिठीतील गाळ काढण्याबाबत गुणवत्तेबाबत अधिकाऱ्यांनी प्रचंड आग्रही असणे आवश्यक आहे, असे महापालिका आयुक्तांनी नमूद केले.
संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम तातडीने करा
दादर-धारावी नाला येथे आयुक्त भिडे यांनी भेट दिली. यावेळी माहिती देताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, दादर धारावी नाल्यात नागरिकांकडून फेकला जाणारा तरंगता कचरा ही मोठी समस्या आहे. अशा ठिकाणी एकापेक्षा अधिक वेळा नालेस्वच्छता करणे अपेक्षित आहे. या नाल्याच्या वरील भागात काही ठिकाणी भिंत खचली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो. तरी संबंधित प्रभाग अधिकारी तसेच पर्जन्य जलवाहिन्या विभागाने समन्वयाने भिंतीच्या दुरुस्तीचे काम विनाविलंब करावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.