पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा; विद्युत विभागात ६८६ नवघाणी कामगारांची भरती, कॉल सेंटर कार्यान्वित करणार - सोनिया सेठी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा; विद्युत विभागात ६८६ नवघाणी कामगारांची भरती, कॉल सेंटर कार्यान्वित करणार - सोनिया सेठी

वीजपुरवठा खंडित झाला तर बेस्ट उपक्रमाच्या टोल फ्री व विभाग कार्यालयात फोन करूनही कोणी दाद देत नाहीत, असे बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी बेस्ट उपक्रमाच्या निदर्शनास आणून दिले. पावसाळा जवळ आला असून वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी ६८६ नवघाणी कामगारांची भरती करण्यात येणार असून मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

Swapnil S

मुंबई : वीजपुरवठा खंडित झाला तर बेस्ट उपक्रमाच्या टोल फ्री व विभाग कार्यालयात फोन करूनही कोणी दाद देत नाहीत, असे बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी बेस्ट उपक्रमाच्या निदर्शनास आणून दिले. पावसाळा जवळ आला असून वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी ६८६ नवघाणी कामगारांची भरती करण्यात येणार असून मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, पावसाळ्यात मुंबई शहरातील लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात येणार असून यासाठी ॲॅक्शन प्लॅन तयार करण्यात येत असल्याचे बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी सांगितले.

बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाचे मुंबई शहरात १० लाख वीज ग्राहक आहेत. वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी खोदकाम करणे, उपकेंद्रात केबल टाकणे आदी कामे नैमित्तिक कामगारांच्या माध्यमातून केली जातात. मात्र मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांपासून विशेष करून पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होते. वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करण्यासाठी बेस्टला मोठ्या प्रमाणात कर्मचारी लागतात. कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये यासाठी बेस्टने यंदाच्या पावसाळ्यात विद्युत पुरवठा विभागात तातडीने ६८६ नवघाणींची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्मचारी विभागाच्या भरती विभागामध्ये प्रशासकीय आदेश ९४ अंतर्गत ३३६ आणि प्रशासकीय आदेश १५८ अंतर्गत ४३२ अर्ज प्रलंबित आहेत. या प्रलंबित अर्जाना प्राधान्य देऊन त्यातून ६८६ उमेदवारांची तात्पुरते नवघाणी म्हणून नियुक्ती करण्यात येईल.

आणखी पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव

विद्युत पुरवठा विभागाच्या मंजूर संख्याबळाव्यतिरिक्त आणखी २४५० तात्पुरती पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या या विभागात २४०४ मंजूर पदांपैकी २२३३ कामगार (१९६२ कायमस्वरूपी आणि २७१ तात्पुरते) कार्यरत आहेत.

नवघाणी कामगारांना बँक लोन मिळत नसल्याची तक्रार

बेस्ट उपक्रमाने नवघाणी हे नाव बदलून त्याजागी चांगले नाव या कर्मचाऱ्यांना द्यावे, अशी सूचना बेस्ट समिती सदस्य (ठाकरे गट) नितीन नांदगावकर यांनी मांडली. तसेच या कर्मचाऱ्यांना बँक कर्ज ही देत नाही. नवघाणी कर्मचारी खोदकाम करून केबल टाकण्याचे काम करतात. निवृत्त कर्मचाऱ्यांची आणि अनुकंपातत्त्व यादीवरील उमेदवारांना नवघाणी कर्मचारी म्हणून घेण्यात येत असल्याचे यावेळी बेस्ट प्रशासनाने सांगितले.

२४ बाय ७ कॉल सेंटर

मुंबई शहरात बेस्टची वीज आहे. पावसाळ्यात विजेसंदर्भातील समस्या जास्त असतात. ग्राहक बेस्टच्या संपर्क क्रमांकावर फोन करतात. परंतु तेथे कोणीही कर्मचारी फोन घेत नाहीत. त्यामुळे ग्राहक वैतागतात. ही समस्या सोडविण्यासाठी बेस्टने २४ बाय ७ कॉल सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कॉल सेंटरमध्ये सहा कर्मचारी कार्यरत राहणार असून त्यांच्याकडे किमान सहा फोन असतील. बेस्टने पावसाळ्याचा आराखडा तयार केला असल्याची माहिती बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिली.

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड