मुंबई

मुंबई-गोवा महामार्गावरील नवीन सिमेंटचे रस्तेही खचले; शिवसेना ठाकरे गटाच्या पाहणी दौऱ्यात प्रशासनाची पोलखोल

१५ वर्षांपासून प्रलंबित आणि अनेकदा आश्वासनांचे गाजर दाखवण्यात आलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था आजही जैसे थे असल्याचे ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पाहणी दौऱ्यात स्पष्ट झाले.

Swapnil S

पेण : १५ वर्षांपासून प्रलंबित आणि अनेकदा आश्वासनांचे गाजर दाखवण्यात आलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था आजही जैसे थे असल्याचे ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पाहणी दौऱ्यात स्पष्ट झाले. पेण तालुक्यातील खारपाडा ते आमटेम या मार्गावर झालेल्या पाहणी दौऱ्यात रस्त्यावरील खड्डे, सिमेंट काँक्रिटमधून बाहेर आलेल्या सळ्या, उड्डाणपुलावरील तडे, जलनिचरा नसलेली गटारव्यवस्था यामुळे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चव्हाट्यावर पोलखोल करण्यात आली.

या दौऱ्यात शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांनी थेट जिल्ह्याच्या खासदार व मंत्र्यांवर टीका करत विचारले की, या रस्त्यावरून रोज प्रवास करणाऱ्या लोकप्रतिनिधींना ही दुरवस्था दिसत नाही का?त्यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, महिला संघटिका दीपश्री पोटफोडे, समन्वयक नरेश गावंड, महिला उपजिल्हा प्रमुख दर्शना जवके, माजी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, युवा सेना व शहर प्रमुख, सरपंच, विभागप्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाहणी दरम्यान खारपाडा गावाजवळील सर्व्हिस रोडला गटार नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट घरात घुसते, तर दुरशेत गावातील नागरिकांसाठी महामार्ग पार करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. तरणखोप आणि डोलवी येथील उड्डाणपुलावर प्रचंड खड्डे असून नव्याने बनवलेल्या सिमेंट रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. उंबर्डे ते वाशी नाका दरम्यानच्या रस्त्यावरही अशाच प्रकारची दयनीय स्थिती आहे.

रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे, मंत्री भरत गोगावले, अदिती तटकरे आणि आमदार या महामार्गावरून नेहमी प्रवास करतात. मात्र, त्यांनी प्रवास करताना डोळ्याला पट्टी बांधली आहे काय? निगडे पुलाची स्थिती गंभीर असून तातडीने उपाययोजना झाली नाही, तर सावित्री दुर्घटनेसारखी घटना येथेही घडू शकते. याला जबाबदार प्रशासन आणि शासन असेल.

- समीर म्हात्रे, तालुका प्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

या महामार्गाचे काम पूर्ण होण्याची डेडलाइन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०२५ दिली होती. मात्र, दरवर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर पाहणी दौरे होतात आणि आश्वासने दिली जातात. ही सर्व वल्गना कोकणवासीयांची अवहेलना असून या दौऱ्यातून सत्ताधाऱ्यांचे व ठेकेदारांचे खोटेपण समोर आले आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो.

- प्रसाद भोईर, जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प