Mumbai : घटस्फोट घेणार म्हणून पतीने घेतला सूड; पत्नीचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल, गुन्हा दाखल 
मुंबई

Mumbai : घटस्फोट घेणार म्हणून पतीने घेतला सूड; पत्नीचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल, गुन्हा दाखल

मुंबईत घटस्फोटाच्या वादातून पतीने पत्नीचे खासगी फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

Mayuri Gawade

घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर पत्नीची बदनामी करण्यासाठी तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

पीडित महिला (वय ३१) मूळची राजस्थानची असून सध्या मालाड पूर्व येथे राहत असून ती UPSC परीक्षेची तयारी करत आहे. तिचा पती पश्चिम रेल्वेत वरिष्ठ विभाग अभियंता म्हणून कार्यरत असून त्याचे कार्यालय वांद्रे पूर्व येथील खार रोड येथे आहे. दोघांचा विवाह २५ नोव्हेंबर २०२० रोजी झाला. ते दोघे गोरेगाव पश्चिम येथे राहत होते.

विवाहबाह्य संबंधांमुळे वाद

तक्रारीनुसार, विवाहानंतर काही काळातच पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे महिलेला समजले. यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. अखेर २३ ऑगस्ट २०२४ रोजी ती माहेरी राहायला गेली. त्यानंतर आरोपी तिच्या घरी जाऊन शिवीगाळ करत आत्महत्येची धमकी देत होता. तसेच तिच्यासह कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून गैरप्रकार

यानंतर महिला वेगळी राहू लागली. दरम्यान आरोपीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून प्रोफाइलमध्ये बदल केले आणि तिच्याच नावाने तिच्या मित्रांशी संवाद साधला. याला विरोध केल्यावर त्याने तिला बदनाम करण्याची धमकी दिली.

घटस्फोट अर्जानंतर वाढला त्रास

महिलेने जून २०२५ मध्ये वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर आरोपी अधिक आक्रमक झाला. १५ जानेवारी २०२६ रोजी त्याने तिच्या अकाउंटवर आक्षेपार्ह फोटो आणि पोस्ट अपलोड केल्या. तसेच फोनवरून धमक्या देत तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची आणि ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

१८ मार्च २०२६ रोजी पुन्हा आरोपीने 'वन-टाइम व्ह्यू' स्वरूपात तिचे खासगी फोटो पोस्ट करून नंतर हटवले. मात्र, तक्रारदार महिलेला ते दुसऱ्या मोबाईलवरून पाहता आले.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

या प्रकारामुळे महिलेची बदनामी झाल्याचा आरोप असून आरोपीने तिच्या मैत्रिणीला आणि मैत्रिणीच्या पतीला अपमानास्पद व्हॉइस मेसेज पाठवले. या तक्रारीच्या आधारे दिंडोशी पोलिसांनी २१ मार्च रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५१(२), ३५२, ३५६ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६C, ६६E आणि ६७A अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Mumbai Local Mega Block : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका

मुंबईत उष्माघाताचा धोका; दुपारी ११ ते २ प्रकल्प कामे बंद ठेवा, नगरसेविकेचे महापालिका आयुक्तांना पत्र

'देव त्यांचं भलं करो'; तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांचा मुलगा मल्हारने सोडलं मौन

Mumbai : अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा! अनधिकृत बांधकामावर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका