Mumbai : धावत्या लोकलसमोर बायकोला ढकलून दिले; मुलुंड स्थानकावर धक्कादायक प्रकार, आरोपी नवरा अटकेत

मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकावर वैवाहिक वादातून पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या प्रकारानंतर आरोपी नवरा फरार झाला होता. विशेष म्हणजे, घटनेच्या काही तासांपूर्वीच पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार केली होती.
Mumbai : धावत्या लोकलसमोर बायकोला ढकलून दिले; मुलुंड स्थानकावर धक्कादायक प्रकार, आरोपी नवरा अटकेत
Mumbai : धावत्या लोकलसमोर बायकोला ढकलून दिले; मुलुंड स्थानकावर धक्कादायक प्रकार, आरोपी नवरा अटकेत'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुलुंड रेल्वे स्थानकावर वैवाहिक वादातून पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी राजुकुमार गुप्ता (४२) याला पोलिसांनी सूरतमधून अटक केली आहे. १४ मार्च रोजी सकाळी ही घटना घडली असून सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, राजुकुमार गुप्ता हा इलेक्ट्रिशियन असून त्याने पत्नी पुष्पा गुप्ता (३६) हिला धावत्या लोकलसमोर ढकलून ठार केले. घटनेनंतर आरोपी आपल्या धाकट्या मुलासह फरार झाला होता. विशेष म्हणजे, या घटनेच्या काही तासांपूर्वीच पुष्पा यांनी पोलिसांकडे तक्रारही दिली होती.

नेमकं काय घडलं?

मृत महिलेचा भाऊ कमलेश कुमार गुप्ता (३०), जो सैन्यात जवान आहे, याने दिलेल्या तक्रारीनुसार पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असत. त्यामुळे तो आपल्या बहिणीला आणि तिच्या १५ वर्षीय मुलाला उत्तर प्रदेशमधील मूळ गावी घेऊन जाण्यासाठी मुंबईत आला होता.

१४ मार्च रोजी ते उत्तर प्रदेशला जाण्याच्या तयारीत असताना राजुकुमार आणि पुष्पा यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर पुष्पा यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पुढे कमलेश, पुष्पा आणि तिचा १५ वर्षीय मुलगा मुलुंड स्थानकावर पोहोचले.

दरम्यान, कमलेशला आपले आर्मी ओळखपत्र राजुकुमारच्या घरी राहिल्याचे लक्षात आले. त्यामुळे तो आणि त्याचा भाचा ते आणण्यासाठी परत गेले. मात्र संतप्त झालेल्या राजुकुमारने त्यांना घरातच बंद करून ठेवले.

त्यानंतर आरोपी मुलुंड स्थानकावर आला. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उभ्या असलेल्या पत्नीला पाहताच त्याने तिला काही कळायच्या आत समोरून येणाऱ्या धावत्या लोकलसमोर ढकलले आणि तेथून फरार झाला, असे एफआयआरमध्ये नमूद आहे.

सीसीटीव्हीत प्रकार कैद

ही घटना घडल्यानंतर प्रवाशांनी तात्काळ स्टेशन मास्टरला माहिती दिली. रेल्वे प्रशासनाने जखमी अवस्थेतील पुष्पा यांना तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कमलेशने शेजाऱ्यांकडून मदत मागितली आणि त्यांच्या मदतीने घराचे दार उघडण्यात आले, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटना कैद झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी कुर्ला जीआरपीने राजुकुमार गुप्ता याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (खून) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in