मेघा कुचिक/मुंबई
शुक्रवार रात्री जुहू येथे रस्त्यावरील एका किरकोळ अपघातानंतर झालेल्या वादानंतर, कारने एका ट्रॅफिक पोलिसाला अंगावर घालून उडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी जुही मेहता (३०) या महिलेला अटक केली. दरम्यान, जुही मेहता हिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायलयीन कोठडी सुनावली.
जुही मेहता जुहू तारा रोड येथील रहिवासी असून एका डिजिटल मीडिया कंपनीत चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. ही घटना ३० ऑक्टोबरला रात्री ८:१५ ते ८:३० दरम्यान विलेपार्ले (पश्चिम) येथील एन. एस. रोड क्रमांक १० वरील प्रतीक्षा बंगल्यासमोर संगीत महाभारती जंक्शनजवळ घडली.
जुही मेहता हिची गाडी आणि एका दुसऱ्या एका गाडीमध्ये किरकोळ धडक झाली. त्यानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या मधोमध थांबल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
पोलिसाला दिली धमकी
या भागात वाहतूक सुरळीत करत असलेले ट्रॅफिक कॉन्स्टेबल प्रशांत हाके यांनी दोन्ही चालकांना गाड्या बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, मेहता हिने त्यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. पोलिसांच्या तक्रारीनुसार, तिने कॉन्स्टेबलला धमकावले की, 'मी खूप श्रीमंत आहे, माझी खूप ओळख आहे, मी तुला किड्यासारखी चुरगाळून टाकेन आणि महिलाविषयक गुन्ह्यात अडकवीन.'
महिलेविरोधात दुसरी तक्रार
दणका बसलेल्या वॅगनआर कारचा चालक नवीनकुमार झा (४२) यानेही सांताक्रूझ ट्रॅफिक विभागाशी संपर्क साधून या अपघातासंदर्भात मेहताविरुद्ध स्वतंत्र तक्रार नोंदवली. बीएमडब्ल्यूने वॅगनआरला मागून धडक दिली, ज्यामुळे कारची डिकी, बंपर, टेल लाइट, सेन्सर लॉक आणि पेंटचे मोठे नुकसान झाले.
हाकेंवर गाडी चढवली
कॉन्स्टेबल हाके यांनी गाडीसमोर उभे राहून तिला गाडी थांबवण्यास सांगितले असता मेहताने तिच्या कारचा वेग वाढवून ती त्यांच्या दिशेने चालवली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हाके यांना बाजूला व्हावे लागले. त्यानंतर तिने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे जेव्हीपीडी जंक्शनच्या दिशेने गाडी पळवली.