मुंबई : मुंबई लोकलने रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मध्यरात्रीनंतर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या लेडीज डब्यात सुरक्षा कर्मचारी नसल्याची परिस्थिती एका महिलेने व्हिडीओद्वारे समोर आणली आहे. डब्यात एकही सुरक्षा कर्मचारी नसल्याचं दाखवत तिने रेल्वेच्या मोटरमनशी संपर्क साधला. यानंतर मोटरमनने अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तिच्यासाठी सुरक्षा व्यवस्था केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'अचानक कोणी चढलं तर काय करु'
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये महिला रेल्वे स्थानकावरील होमगार्ड कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसत आहे. यावेळी लेडीज डबा जवळपास रिकामा असल्याचं दाखवत ती सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करते.
व्हिडीओमध्ये महिला म्हणते, "हे पाचव्यांदा किंवा सहाव्यांदा होत आहे. या लेडीज डब्यात एकही सिक्युरिटी नाही. अचानक कोणी इथून चढलं तर मी काय करू?"
तिने पुढे सांगितलं की, रात्री सुमारे १२.०३ वाजता ती प्रवास करत होती. यावेळी तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या आणखी एका महिलेला डोंबिवलीला उतरायचं होतं. मात्र, लेडीज डब्यात सुरक्षेसाठी कोणीही कर्मचारी नसल्याने ती महिला तिच्यासोबत ठाकुर्लीपर्यंत आली आणि तिथे उतरली.
'पोलिसांनी जेंट्स डब्यात जाण्याचा सल्ला दिला'
महिलेने सुरक्षेसाठी पोलिसांकडे मदत मागितली असता, तिला लेडीज डब्याऐवजी जेंट्स डब्यात जाण्याचा सल्ला देण्यात आल्याचं तिने सांगितलं.
तिच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिराच्या कल्याणकडे जाणाऱ्या लोकलमध्ये अनेकदा ठाकुर्ली स्थानकावर सुरक्षा कर्मचारी उतरतात. त्यामुळे ठाकुर्ली ते कल्याणदरम्यान एखादी अनोळखी व्यक्ती लेडीज डब्यात चढल्यास सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल तिने उपस्थित केला.
मोटरमनने केली मदत
यानंतर महिलेने लोकलच्या मोटरमनशी संपर्क साधून आपण एकट्या प्रवास करत असल्याचं आणि सुरक्षेबाबत चिंता वाटत असल्याचं सांगितलं. महिलेच्या म्हणण्यानुसार, मोटरमनने याची दखल घेत अधिकाऱ्यांशी समन्वय साधला आणि तिच्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्याची व्यवस्था करण्यात आली.
सुमारे १२.३० वाजता ती कल्याणला पोहोचली. तिच्या म्हणण्यानुसार, ठाकुर्ली येथे महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होत्या आणि मोटरमनच्या समन्वयामुळे एका महिला कॉन्स्टेबलला तिच्यासोबत पाठवण्यात आलं.
'महिलांसाठी प्रवास सुरक्षित ठेवा'
व्हिडीओमध्ये महिलेने सांगितले की. अशा परिस्थितीचा अनेकदा सामना करावा लागल्याने तिने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला, मात्र. सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांवर आरोप करत नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. काही कॉन्स्टेबल कल्याणपर्यंत प्रवासासोबत असतात, असंही तिने नमूद केलं.
"महिला एकट्या प्रवास करत असतील तर त्यांना जेंट्स डब्यात जाण्यास सांगण्याऐवजी लेडीज डब्यातच सुरक्षा द्यायला हवी. मुंबई लोकल हा महिलांसाठी सुरक्षित प्रवासाचा पर्याय आहे, असं आम्ही मानतो. त्यामुळे महिलांचा रात्रीचा प्रवास सुरक्षित राहील याची काळजी घ्या," असं आवाहन तिने केलं.
दरम्यान, महिलेने व्हिडीओमध्ये केलेले दावे स्वतंत्रपणे पडताळलेले नाहीत. या प्रकरणाबाबत रेल्वे किंवा पोलिस प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही