Mumbai : दोन हजार कोटी खर्चुन हॉटेल, पार्किंग हब, शॉपिंग मॉल; मानखुर्द जकात नाक्यावर ३० मजली इमारत X| mybmc
मुंबई

Mumbai : दोन हजार कोटी खर्चुन हॉटेल, पार्किंग हब, शॉपिंग मॉल; मानखुर्द जकात नाक्यावर ३० मजली इमारत

मुंबईच्या वेशीवर ओस पडलेल्या जकात नाक्यावर पार्किंग हब, शॉपिंग मॉल, हॉटेल, व्यावसायिक गाळे, कार्यालये साकारण्यात येणार आहे. मानखुर्द येथील जकात नाक्यावर सोयीसुविधांसह ३० मजली इमारत उभारण्यात येणार असून यासाठी मुंबई महापालिका तब्बल २ हजार कोटी खर्च करणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईच्या वेशीवर ओस पडलेल्या जकात नाक्यावर पार्किंग हब, शॉपिंग मॉल, हॉटेल, व्यावसायिक गाळे, कार्यालये साकारण्यात येणार आहे. मानखुर्द येथील जकात नाक्यावर सोयीसुविधांसह ३० मजली इमारत उभारण्यात येणार असून यासाठी मुंबई महापालिका तब्बल २ हजार कोटी खर्च करणार आहे. दरम्यान, प्रकल्पाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. निविदा प्रक्रिया पुढील पाच ते सहा महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरासह राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या वाहनांसाठी शहराच्या प्रवेशद्वारावरच पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे शहरातील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा महापालिकेचा दावा आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येणार असून साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेले दहिसर आणि मानखुर्द येथील जकात नाके २०१७ पासून बंद आहेत. या जागांचा वापर करून महसूल वाढविण्याच्या दृष्टीने पार्किंग हब आणि व्यावसायिक सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर जकात नाक्यावर आंतरराज्यीय पार्किंग हबच्या कामाला सुरुवात झाली असतानाच मानखुर्द येथेही अशाच स्वरूपाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

३५० बसेस १३०० वाहन पार्किंग क्षमता

प्रस्तावित केंद्रात सुमारे ३५० बस आणि १,२०० ते १,३०० कार पार्किंगची क्षमता असेल. याशिवाय खासगी कार्यालये, व्यावसायिक गाळे, तारांकित हॉटेल्स, निवास व्यवस्था आणि फूड प्लाझा उभारण्यात येणार आहेत. या सुविधा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यातून महापालिकेला नियमित महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

सुधारणा करा

मानखुर्द येथील जकात नाक्याच्या जागेवर पालिकेमार्फत वाहतूक आणि व्यावसायिक केंद्र प्रस्तावित आहे. अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी मानखुर्द येथील या बहुविध वाहतूक आणि व्यावसायिक केंद्र स्थळास नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, विविध निर्देश दिले. यामध्ये प्रकल्पाचे नियोजन, आर्थिक परिणाम, तांत्रिक व्यवहार्यता तसेच प्रकल्पाच्या पुढील विकासासंदर्भातील विविध सूचनांचा समावेश आहे. या पाहणीदरम्यान करण्यात आलेल्या सूचना व निरीक्षणांचा समावेश करून प्रस्तावित आराखड्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

EPFO वेतन मर्यादा आता २५ हजारांपर्यंत

यूजीसीचे नियम कायदा बनणार नाही - मोहन भागवत

पाणी संकटासाठी टंचाई कृती आराखडा; गावांची यादी तयार करण्याची सूचना