मुंबई : मुंबई मेट्रो लाइन ३च्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या टप्प्याशी जोडण्यासाठी बेस्टने ३२ बस मार्गांचे तर्कसंगतीकरण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे प्रवाशांचा सरासरी प्रतीक्षा कालावधी १५ मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.
याअंतर्गत १२ मार्गांवर सेवा वाढविणे (४६४ फेऱ्या), ६ मार्गात बदल करणे (२६४ फेऱ्या), ३ मार्गांचा विस्तार करणे (७८ फेऱ्या) आणि १० मार्गात कपात करणे (४३५ फेऱ्या) यांचा समावेश आहे. एकूण १,२४१ फेऱ्यांची बेस्टची योजना आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत बेस्टने मुंबई मेट्रो लाईन३ (कुलाबा-बीकेसी-आरे) च्या पूर्ण कार्यान्वयनाच्या पार्श्वभूमीवर बसमार्ग तर्कसंगतीकरण धोरण सादर केले. बसमार्ग बदलाबाबत वृत्तसंस्थेकडे अधिकृत कागदपत्रे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मार्ग तर्कसंगतीकरण व्यतिरिक्त दुसऱ्या टप्प्यासाठी १७ मार्गांवर २९ अतिरिक्त बस आणि तिसऱ्या टप्प्यासाठी ३० मार्गांवर ५० बस तैनात करण्याची योजना आहे. सध्या या मार्गांवर अनुक्रमे ४५ आणि ८४ बस चालवल्या जात आहेत. बेस्ट अधिकाऱ्यांनुसार, या तर्कसंगतीकरणाचे उद्दिष्ट म्हणजे बस सेवा मेट्रो कॉरिडॉरशी एकत्रित करणे, फीडर सेवा देणे आणि कनेक्टिव्हिटीतील कमतरता भरून काढणे होय. याशिवाय गर्दीच्या वेळेत मागणी असलेल्या मार्गांवर अधिक बस चालवण्यात येणार आहेत. या नव्या सेवा ‘रिंग-रूट’ पद्धतीने चालवण्यात येणार असून त्याद्वारे मेट्रो स्थानकांना उपनगरीय रेल्वे स्थानके आणि व्यापारी केंद्रांशी जोडले जाईल.
भुयारी कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्याचा (बीकेसी ते वरळी नाका) लवकरच प्रारंभ होणार असून शेवटचा टप्पा (कफ परेड) येत्या काही महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. पहिला टप्प्याचे (आरे जेव्हीएलआर ते बीकेसी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबर २०२४ मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्टच्या आर्थिक स्थितीचा गेल्या महिन्यात आढावा घेतला होता.
-बेस्टच्या ताफ्यात सध्या २,८०० बस आहेत. दशकापूर्वी ही संख्या ४,५०० होती. दररोज ३० लाख प्रवाशांना बेस्टद्वारे वाहतूक-प्रवासी सेवा पुरविली जाते.
-मुंबईतील उपनगरीय रेल्वे नेटवर्कनंतर बेस्ट ही दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये प्रवासी सेवा उत्पन्न ७०० कोटी रुपयांपेक्षा खाली आले आहे.