मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘एस’ विभागातील २२९ मोटरलोडर कामगार मागील पाच दिवसांपासून त्यांच्या नियोजित कामाच्या प्रतीक्षेत असून, प्रशासनाकडून लेखी आदेश मिळाल्याशिवाय कोणतेही नवीन साफसफाईचे काम स्वीकारू नये, असे आवाहन "म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने"चे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी केले आहे.
पालिकेच्या ‘एस’ विभागात कचरा संकलन आणि परिवहनाचे काम कंत्राटदारामार्फत करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मोटरलोडर कामगारांच्या नोकऱ्या, वारसाहक्क आणि पदोन्नतीच्या संधींवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा डॉ. बापेरकर यांनी केला आहे.
त्यांनी सांगितले की, २८ जुलै २०२५ रोजी काही कामगार संघटना आणि पालिका प्रशासन यांच्यात झालेल्या करारानुसार, 'घनकचरा संकलन, परिवहन आणि निष्कासन' प्रकल्पासाठी १४ मे २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेला कामगार संघटना विरोध करणार नाहीत, असे मान्य करण्यात आले होते. मात्र, या कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मोटरलोडर कामगारांनी त्यास विरोध दर्शविला आहे.
प्रशासनाकडून मोटरलोडर कामगारांना साफसफाईचे काम देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असला, तरी हे काम कोणाच्या आदेशाने देण्यात येत आहे, याबाबत ‘एस’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्पष्ट माहिती देऊ शकल्या नसल्याचा दावा डॉ. बापेरकर यांनी केला.
दरम्यान, परिमंडळ-६ चे उपायुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या आदेशानुसार ‘एस’ विभागाच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद, सहाय्यक अभियंता सचिन गायकवाड, सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक राठोड यांच्यासह म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर, सदस्य प्रशांत जाधव, आणि सर्व मोटरलोडर कामगार उपस्थित होते.
हजारो कामगार अतिरिक्त ठरण्याची शक्यता
या करारामुळे महापालिकेचे सुमारे ८ हजार कायम मोटरलोडर कामगार आणि सुमारे ७ हजार कंत्राटी कामगार अतिरिक्त ठरण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केला. या कामगारांना पर्यायी काम कोणते दिले जाणार, याबाबत करारात स्पष्ट उल्लेख नसल्याचेही त्यांनी नमूद केले.