अमित श्रीवास्तव/मुंबई
अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या गंभीर नियमांचे उल्लंघन झाल्याचे निरीक्षणादरम्यान समोर आल्यानंतर, महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील प्रतिष्ठित ‘पारसी डेअरी फार्म प्रायव्हेट लिमिटेड’चा एफएसएसएआय परवाना तातडीने निलंबित केला आहे. तसेच, अन्न सुरक्षा उल्लंघनांविरोधात राज्यभरात राबवलेल्या धडक मोहिमेत प्रशासनाने ३५.३६ लाख रुपयांचे अन्नपदार्थ जप्त करून नष्ट केले आहेत.
प्रिन्सेस स्ट्रीट येथील या डेअरीच्या उत्पादन केंद्रावर १४ जुलै रोजी केलेल्या तपासणीत अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६, तसेच अन्न सुरक्षा आणि मानके नियम, २०११ चे अनेक उल्लंघन झाल्याचे आढळून आले. या तपासणी अहवालाच्या आधारे, संबंधित नियुक्त अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त (अन्न), परिमंडळ-१ यांनी १५ जुलै रोजी कंपनीचा ‘एफएसएसएआय’ परवाना तातडीने निलंबित केला.
एफडीए अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. यात उत्पादन आणि साठवणूक क्षेत्रातील भिंतींवर बुरशी आलेली असणे, अस्वच्छता, माशांचा सुळसुळाट, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसणे, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदी अपूर्ण असणे आदी त्रुटी आढळल्या.