सोमेंद्र शर्मा/मुंबई
मुंबई शहराच्या कायदा व सुव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने मुंबई पोलिसांच्या विशेष ‘माऊंटेड पोलीस युनिट’ (घोडदळ पथक) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी १.२७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
या उपक्रमाची सुरुवात २८ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयाने झाली होती, ज्यामध्ये ३० घोड्यांचा समावेश असलेल्या घोडदळ पथकाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली होती. या पथकाची रचना वर्षभरापूर्वीच निश्चित झाली असली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी निधीची गरज होती. ही अडचण दूर करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाने १७ जून २०२६ रोजी निधी मंजुरीचा औपचारिक प्रस्ताव सादर केला होता. या घोडदळ पथकामुळे मुंबईकरांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे.
अफाट गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य
हा संपूर्ण खर्च चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी उपलब्ध असलेल्या अनुदानातून केला जाणार आहे तसेच बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत असलेले आहरण व संवितरण अधिकारी (डीडीओ) यांना हा मंजूर निधी काढण्याचे आणि वितरित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या घोडदळ पथकामुळे शहरातील अफाट गर्दीवर नियंत्रण ठेवणे, मुंबईच्या किनारपट्टीवर गस्त घालणे आणि राज्यस्तरीय प्रमुख कार्यक्रमांदरम्यान संचलन करणे यासाठी मुंबई पोलिसांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सशस्त्र पोलीस दलातून पथक स्थापन
या पथकाचे व्यवस्थापन सुलभ व्हावे यासाठी मनुष्यबळाचीही रचना करण्यात आली आहे. नायगाव येथील सशस्त्र पोलीस दलातून एकूण ३८ पोलीस कर्मचाऱ्यांची या पथकात वर्गवारी करण्यात आली आहे. या विशेष पथकात १ पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय), १ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय), ४ पोलीस हवालदार आणि ३२ पोलीस अंमलदारांचा समावेश असून, त्यांच्यावर घोड्यांची निगा राखणे आणि गस्त घालण्याची जबाबदारी असेल.
असा होणार खर्च
या प्रस्तावावर विचार केल्यानंतर राज्य सरकारने आवश्यक निधी मंजूर केला आहे. अधिकृत आदेशानुसार, हा निधी तातडीने पथकाच्या कामकाजासाठी व लॉजिस्टिक्ससाठी वापरला जाईल. यामध्ये घोडे खरेदी करणे, उच्च दर्जाचे खोगीर व सामान, विशेष प्रशिक्षण साहित्य व उपकरणे, घोड्यांच्या वैद्यकीय चाचण्यांचा खर्च आणि व्यावसायिक घोडे प्रशिक्षकांचे वेतन यांचा समावेश आहे.