Mumbai : बाल्कनीचा भाग कोसळून; वाळकेश्वरला एकाचा मृत्यू 
मुंबई

Mumbai : बाल्कनीचा भाग कोसळून; वाळकेश्वरला एकाचा मृत्यू

मुंबईत पावसाचा जोर वाढला असून विविध घटनांचे सत्र सुरु झाले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत पावसाचा जोर वाढला असून विविध घटनांचे सत्र सुरु झाले आहे. वाळकेश्वर येथील बाबुलनाथ रोडवरील सूर्या प्रकाश इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचा काही भाग मंगळवारी रात्री ११.२२ च्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत संतोष रामचंद्र भरसकर (५१) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

वाळकेश्वर येथील बाबुलनाथ रोडवर सूर्या प्रकाश म्हाडाची तीन मजली सेस इमारत आहे.  मंगळवारी रात्रीच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचा काही भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि संबंधित विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत संतोष रामचंद्र भरसकर (वय ५१) हे जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर त्यांना जे. जे. रुग्णालय येथे नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे  डॉक्टरांनी घोषित केले.

या दुर्घटनेनंतर परिसरात खबरदारीचे उपाय करण्यात आले असून संबंधित यंत्रणांकडून इमारतीच्या सुरक्षिततेची पाहणी करण्यात आली. दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

भिवंडीत विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

भिवंडी: भिवंडीत विजेच्या धक्क्याने २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शहरातील तीनबत्ती परिसरातील एका दुकानात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, एका दुकानातील भांडी बाजूला असलेल्या मंदिरात ठेवली जात होती. ही भांडी मुस्तफा घेऊन येत असताना त्याला विजेचा धक्का लागला. जखमी अवस्थेत मुस्तफा यास स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आमच्या मुलाचा मृत्यू निष्काळजीपणाने झाला असून या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी मयत मुस्तफा शेख याच्या परिवाराने केली.

छत कोसळून झोपेतच एकाचा मृत्यू

नवी मुंबई : कामोठे येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास एका अपार्टमेंटमध्ये झोपेत असताना बेडरूमच्या छताचा स्लॅब अंगावर कोसळल्याने ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. सुरज प्रकाश लोखंडे ( ४५) असे मृताचे नाव असून, ते कामोठे येथील सेक्टर १० मधील 'साई सिद्धी अपार्टमेंट'च्या 'ए' विंगमधील फ्लॅट क्रमांक १०१ चे रहिवासी होते. कामोठे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडे हे रात्री सुमारे १ वाजता झोपण्यासाठी गेले होते. त्यानंतर पहाटे ५.१५ च्या सुमारास त्यांच्या बेडरूमच्या छताचा एक भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने आधी क्रिटी केअर लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र तेथे सकाळी ९.०२ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पंचनामा केला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

EPFO वेतन मर्यादा आता २५ हजारांपर्यंत

यूजीसीचे नियम कायदा बनणार नाही - मोहन भागवत

पाणी संकटासाठी टंचाई कृती आराखडा; गावांची यादी तयार करण्याची सूचना