मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईसह उपनगर आणि कोकण पट्ट्यात पावसाने रौद्ररूप धारण केले असून सलग गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबापुरीला चांगलेच झोडपून काढले. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
बुधवार रात्रीपासून मुंबईत जवळपास संततधार चालू असून अनेक सखल भागांत पाणी भरल्याच्या घटना घडल्या. परळ भागात ठिकठिकाणी रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत असल्याने नागरिकांना चालणेही मुश्किल झाले होते. हिंदमाता परिसरात दरवर्षीप्रमाणे रस्त्यांना ओढे व नद्यांचे स्वरूप आले होते. दादर, लालबाग, गिरगाव, गिरगाव कुंभारवाड इत्यादी भागांमध्ये रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी जमा झाले होते. त्यामुळे वाहतूक धीमी झाली होती व लोकांचे नेहमीचे व्यवहार ठप्प झाले होते. नेपियन सी रोडवरही पाणी साचल्याने वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते.
अंधेरी सबवे गुरुवारीही बराच काळ पाण्याखाली असल्याने वाहतुकीसाठी बंद होता. येथील पाण्याच्या लोंढ्यात काही काळ एक रिक्षा अडकून पडली होती. वडाळ्यातही अनेक भागात पाणी भरल्याने सीएनजी पंप बंद करण्यात आला. यामुळे वाहनचालकांच्या हालात आणखी भर पडली.
चर्चगेट परिसरात झाड कोसळून अनेक वाहनांचे नुकसान झाले. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे वाहतुकीची कोंडी झाली.
रेल्वे सेवा विस्कळीत
गुरुवारी मध्य रेल्वेच्या गाड्या सुमारे १५ मिनिटे उशिराने धावत होत्या, तर पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना ३० मिनिटांहून अधिक काळ वाट पाहावी लागली. मरीन लाइन्स स्थानकावर सकाळी ११:३० ते दुपारी १२ च्या दरम्यान तांत्रिक बिघाड (पॉइंट फेल्युअर) झाल्याने पश्चिम रेल्वेच्या सेवेवर मोठा परिणाम झाला. हा बिघाड ३० मिनिटांत दुरुस्त करण्यात आला असला तरी, दिवसभर गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत राहिले. पश्चिम रेल्वेच्या एकूण ४६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
सांताक्रूझ येथे झाड पडून ८ जखमी
मुंबईत गुरुवारी दिवसभर संततधार पावसाची नोंद झाली असून शहरासह उपनगरांमध्ये विविध ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या एकूण ९१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, सांताक्रूझ (पश्चिम) येथे रहेजा कॉलेजशेजारी झाडाची पाहणी करण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांवर झाड कोसळून आठ जण जखमी झाल्याची गंभीर घटना घडली. सर्व जखमींवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
शुक्रवारसाठी इशारा
३ जुलैच्या सुमारास उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईसह कोकण पट्ट्यात पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अतिवृष्टीच्या काळात विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, समुद्रात भरती-ओहोटीच्या वेळेस किनारपट्टीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पालघरात एक बळी, एक बेपत्ता
पालघर तालुक्यालाही मुसळधार पावसाने जबर तडाखा दिला आहे. दरम्यान, मासेमारीसाठी गेलेल्या एकाचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. पालघर तालुक्यातील मौजे चाहाडे येथील रहिवासी असलेले चंद्र किसन वारठा (वय २८) हे बुधवारी रात्रीच्या सुमारास ओढ्यात मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने ते वाहून गेले. गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मौजे चाहाडे धनवीपाडा येथील नाल्यात त्यांचा मृतदेह मिळून आला. दुसरी घटना मौजे पेठ (केदारपाडा) येथे घडली. विठ्ठल जन्या केदार (वय ५५) हे बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सूर्या नदीत मासेमारीसाठी गेले होते. मात्र, ते परतले नाहीत. ते बेपत्ता असून, प्रशासनाकडून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.