Mumbai : राणीबागेच्या तिकिट दरात दुपटीने वाढ होणार? महसूल वाढीसाठी महापालिकेचा प्रस्ताव  संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : राणीबागेच्या तिकिट दरात दुपटीने वाढ होणार? महसूल वाढीसाठी महापालिकेचा प्रस्ताव

राणीबागेतील पशुपक्ष्यांची देखभाल, त्यांच्या खाद्याचा खर्च, वैद्यकीय सुविधा तसेच उद्यानातील विविध नवीन प्रकल्पांसाठी वाढत्या खर्चामुळे आता राणी बागेच्या तिकिट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका तयार करत आहे.‌

गिरीश चित्रे

मुंबई : राणीबागेतील पशुपक्ष्यांची देखभाल, त्यांच्या खाद्याचा खर्च, वैद्यकीय सुविधा तसेच उद्यानातील विविध नवीन प्रकल्पांसाठी वाढत्या खर्चामुळे आता राणी बागेच्या तिकिट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका तयार करत आहे.‌ सध्या लहान मुलांसाठी २५ रुपये तर प्रौढांसाठी ५० रुपये तिकिट दर असून यात दुप्पटीने वाढ करणे प्रस्तावित आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय अर्थात राणीबागेत पेंग्विन, वाघ-सिंहांसह विविध पशुपक्ष्यांना पाहण्यासाठी दररोज सुमारे ६ ते ७ हजार पर्यटक भेट देतात. यामध्ये मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांचाही मोठा समावेश आहे. मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या राणीबागेतील सफर आता महागण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या तिजोरीवरील वाढता आर्थिक ताण आणि महसूल वाढविण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांचा फटका राणीबागेलाही बसणार असून प्रवेश शुल्कात थेट दुप्पट वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राणी बागेतील पेंग्विनची धमालमस्ती अन् वाघ सिंहाची डरकाळी ऐकणे महागणार आहे.

सध्या राणी बागेत लहान मुलांसाठी २५ रुपये, तर प्रौढांसाठी ५० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. प्रस्तावित दरानुसार लहान मुलांसाठी ५० रुपये आणि प्रौढांसाठी १०० रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबासह राणी बागेत फिरण्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

विशेष म्हणजे, राणीबागेला पर्यटकांचा प्रतिसाद सातत्याने वाढत आहे. २०१७ मध्ये पेंग्विन आणल्यानंतर उद्यानाच्या लोकप्रियतेत मोठी भर पडली. बिबट्या, कोल्हे, तरस, अस्वल यांसह सुमारे ३८२ प्राणी-पक्षी येथे पाहायला मिळतात. त्यामुळे मुंबईतील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून राणीबागेची ओळख निर्माण झाली आहे.

२०२५-२६ या वर्षात तब्बल २५ लाख ४२ हजार १३५ पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. त्यातून महापालिकेला ९ कोटी ८५ लाख ८७ हजार रुपये महसूल मिळाला. चालू आर्थिक वर्षातही पर्यटकांची संख्या समाधानकारक आहे. एप्रिल २०२६ मध्ये १ लाख ९१ हजार ६१५ पर्यटकांनी भेट दिली आणि त्यातून ७५ लाख ३९ हजार रुपये महसूल मिळाला. मे महिन्यात पर्यटकांची संख्या वाढून ३ लाख १० हजार ६५४ झाली, तर महापालिकेच्या तिजोरीत १ कोटी २० लाख ४१ हजार रुपये जमा झाले. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही पर्यटकांचा ओघ कायम असल्याचे सांगण्यात येते.

... म्हणून तिकीट दरात वाढीचे नियोजन

राणीबागेचा विस्तार, मुलुंड येथील प्रस्तावित पक्षी उद्यान तसेच मत्स्यालयासारख्या प्रकल्पांमुळे भविष्यात देखभाल आणि संचालनाचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे उपलब्ध स्रोतांमधून महसूल वाढविण्यावर महापालिकेचा भर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच प्रवेश शुल्क दुप्पट करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबांच्या पर्यटनाच्या खर्चावर होणार आहे.

पालिकेच्या तिजोरीला आधार देण्याचा प्रयत्न

मुंबई महापालिकेवर सध्या मोठ्या आर्थिक जबाबदाऱ्यांचा भार आहे. मुंबईत दोन लाख कोटी रुपयांहून अधिक किंमतीची विविध कामे सुरू आहेत. दुसरीकडे महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये घट होत असल्याने भविष्यातील आर्थिक नियोजनाचे आव्हान प्रशासनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी विविध विभागांना महसूलवाढीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.

९ वर्षांनंतर दरवाढीचा प्रस्ताव

गेल्या काही वर्षांत महापालिकेवर पशुपक्ष्यांच्या देखभालीचा आर्थिक भार वाढला आहे. प्राण्यांसाठी दर्जेदार खाद्य, पशुवैद्यकीय उपचार, पिंजरे व अधिवासाची देखभाल, स्वच्छता तसेच सुरक्षाव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. त्यात राणीबागेत २०१७ पासून प्रवेशशुल्कात कोणतीही मोठी वाढ झालेली नाही. त्यामुळे आर्थिक समीकरण जुळवण्यासाठी तिकिट दरात वाढ करण्याचे विचाराधीन असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ग्राहकांना ३० दिवसांचे रिचार्ज प्लॅन मिळणार; TRAI ने घेतला निर्णय

NTA चे कामकाज आता नव्या कार्यालयात; सुरक्षेची जबाबदारी CISF वर

१ ऑक्टोबरपासून AC, TV महागणार; ५ ते ८ टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता

निवडणूक आयोगाच्या बचावासाठी सत्ताधारी सरसावले; एनडीएचा विरोधकांवर हल्लाबोल

एल निनो संकट तीव्र होणार; पुढील वर्षाचीही तयारी करावी लागेल, फडणवीसांचा इशारा