Mumbai : रिगल जंक्शनची कोंडी फुटणार; २७ सिग्नल होणार रद्द, ६ सिग्नलवर वाहतूक व्यवस्था प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : रिगल जंक्शनची कोंडी फुटणार; २७ सिग्नल होणार रद्द, ६ सिग्नलवर वाहतूक व्यवस्था

दक्षिण मुंबईतील वर्दळीच्या रिगल जंक्शनमधील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे योजना आखली आहे.

Swapnil S

मुंबई : दक्षिण मुंबईतील वर्दळीच्या रिगल जंक्शनमधील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे योजना आखली आहे. या जंक्शनवरील २७ सिग्नल कमी करून केवळ सहा सिग्नलची आधुनिक वाहतूक व्यवस्था उभारली जाणार आहे. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया, कुलाबा, मंत्रालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या दिशेने होणारी वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होईल, असा दावा महापालिकेने केला आहे.

रिगल सिनेमागृह ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानचे पदपथ आकर्षक पद्धतीने विकसित करून हेरिटेज शैलीतील विद्युत रोषणाईही करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी मुंबई महापालिका ३१ कोटी २० लाख २५ हजार रुपये खर्च करणार आहे.

ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या काळा घोडा परिसराचे सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर आता त्याच धर्तीवर रिगल जंक्शन परिसराचे रुपडे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने गेटवे ऑफ इंडियाला भेट देतात. मात्र रिगल जंक्शनवरील गुंतागुंतीच्या सिग्नल यंत्रणेमुळे वाहनचालकांना मोठ्या कोंडीचा सामना करावा लागतो. कुलाबा, मंत्रालय, गेटवे ऑफ इंडिया आणि फोर्ट परिसराकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून संपूर्ण चौकात वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांच्या सल्ल्यानुसार संपूर्ण चौकाची नव्याने रचना करण्यात येणार आहे. विद्यमान २७ सिग्नलऐवजी केवळ सहा सिग्नल ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे चारही दिशांतील वाहनांची हालचाल अधिक सुलभ होऊन चौकातील अनावश्यक प्रतीक्षा कमी होणार आहे.

नव्या आराखड्यानुसार शहीद भगतसिंग मार्गावर (महाराष्ट्र राज्य पोलिस मुख्यालयाजवळ) दोन सिग्नल असतील, जे कुलाबा आणि मंत्रालयाच्या दिशेने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांसाठी कार्यरत राहतील. मादाम कामा रोड ते महात्मा गांधी मार्ग आणि शहीद भगतसिंग मार्ग जोडणाऱ्या वाहतुकीसाठी दोन सिग्नल राहतील, तर महात्मा गांधी मार्गावर फोर्ट आणि कुलाबा दिशेच्या वाहतुकीसाठी आणखी दोन सिग्नल बसविण्यात येणार आहेत.

परिसराच्या सौंदर्यात पडणार भर

वाहतूक सुधारण्याबरोबरच परिसराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. रिगल सिनेमागृह ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावरील पदपथ काळा घोडा परिसराच्या धर्तीवर विकसित केले जाणार असून, त्यासाठी ग्रॅनाइट आणि बेसॉल्ट दगडी फरशांचा वापर केला जाईल. तसेच आकर्षक हेरिटेज लाइट पोल उभारून संपूर्ण मार्ग विद्युत रोषणाईने उजळविण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांसह मुंबईकरांनाही अधिक सुरक्षित, सुबक आणि आनंददायी पायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नीट पेपरफुटीविरोधात निषेधाचा सूर; विविध पक्ष-संघटनांचा निषेध; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Mumbai : दक्षिण मुंबई कोस्टल कनेक्टरला मंजुरी; नरिमन पॉइंट-कफ परेड लिंक रोड अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे

ठाण्यातील चित्रपटगृहांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; ३० ते ५७ वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटच नाही

गणेशोत्सव महोत्सवासाठी व्यापक कृती आराखडा तयार करा; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

Thane : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा