मुंबई : विद्याविहार (पूर्व) येथील स्टेशन रोडवर मंगळवारी दुपारी रस्ता रुंदीकरणासाठी सुरू असलेल्या पाडकामादरम्यान लोखंडी रॉड उडाला व देवेन जैन (१७) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या डोक्याला लागल्याने तो जखमी झाला. या घटनेमुळे महापालिकेच्या कामांमधील सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विद्याविहार (पूर्व) आर. एन. गांधी शाळेजवळ रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. देवेन जैन हा विद्यार्थी मंगळवारी दुपारी ३.५०च्या सुमारास पायी जात असताना पाडकामाच्या ठिकाणावरून एक लोखंडी रॉड उडून त्याच्या डोक्याला लागला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला टाके पडल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपचे नामनिर्देशित नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. विद्यार्थ्याच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिले. प्रवीण छेडा यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून या घटनेची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘एन’ विभागाच्या देखभाल विभागामार्फत जेसीबीच्या साहाय्याने व्यावसायिक गाळ्यांचे पाडकाम सुरू होते. मात्र त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, असा आरोप त्यांनी केला आहे.
कामे करताना सुरक्षेबाबत काळजी गरजेची...
पाडकामाच्या परिसरात सुरक्षात्मक बॅरिकेड्स, इशारा फलक किंवा नागरिकांना सावध करण्यासाठी कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याचा आरोप त्यांनी केला. गर्दीच्या रस्त्यावर अशा प्रकारची कामे करताना सुरक्षेची योग्य काळजी न घेतल्यामुळे पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. जखमी विद्यार्थ्याला महापालिकेमार्फत संपूर्ण वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याची तसेच निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदारांविरोधात प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
उड्डाणपूल प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात
दरम्यान, महापालिकेने विद्याविहार रेल्वे स्थानक उड्डाणपूल प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली आहे. उड्डाणपुलावरील दोन स्पॅनचे काँक्रीट ओतण्याचे काम वगळता बहुतांश काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. भार चाचणी आणि इतर आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ८ सप्टेंबरनंतर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.