Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO 
मुंबई

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर तिरंगा विजय जल्लोष साजरा करण्यात आला. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी तरुणाईच्या आंदोलनाचे कौतुक केले. हजारो समर्थकांची उपस्थिती.

Mayuri Gawade

मुंबई : धर्मेंद्र प्रधान यांच्या केंद्रीय शिक्षणमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर मुंबईत रविवारी (दि.२६) आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा विजय जल्लोष सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मार्चसाठी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात सकाळपासूनच हजारो विद्यार्थी, तरुण आणि समर्थक जमा झाले. हातात तिरंगा घेऊन घोषणाबाजी करत अनेकांनी या विजय रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.

शिवाजी पार्क परिसरात कडक बंदोबस्त

तिरंगा विजय जल्लोष सभेच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले. वसंत देसाई चौक परिसरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सलाम

यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी उपस्थितांना अभिवादन करत, नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या ३१ परीक्षार्थी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आंदोलनदारम्यान विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे आणि सातत्यपूर्ण आंदोलनामुळे हा विजय शक्य झाल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले.

राज ठाकरे म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सरकारला झुकवून दाखवले. जेन झी पिढी सरकारला प्रश्न विचारू शकते, हे या आंदोलनाने सिद्ध केले आहे."

'मंत्री प्रधान' ते 'पंतप्रधान' हा प्रवास आता फार दूर नाही

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनीही तरुणांच्या भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले, "देशातील तरुणांनी हुकूमशाहीला हादरा दिला आहे. ही नव्या भारतातील तरुणाईची ताकद आहे. 'मंत्री प्रधान' ते 'पंतप्रधान' हा प्रवास आता फार दूर नाही. नितीन गडकरी यांच्या इथेनॉल धोरणाबाबत आणि निर्मला सीतारामन यांच्या निर्णयांबाबतही जनतेमध्ये नाराजी आहे. आता ही पिढी प्रत्येक प्रश्नावर सरकारला जाब विचारणार आहे."

'हा आमचा विजय आहे'

मार्चमध्ये सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एका विद्यार्थ्याने सांगितले, "परीक्षेतील गैरव्यवस्थेविरोधात आम्ही अनेक दिवस आंदोलन केले. अखेर आमच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. हा विजय साजरा करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत."

तर आणखी एका समर्थकाने सांगितले, "सरकार आमच्या प्रश्नांना उत्तर देत नव्हते. या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांना जनतेसमोर उत्तर द्यावे लागते, हे दाखवून दिले. यापुढेही आम्ही प्रश्न विचारत राहू."

सिद्धिविनायक मंदिरापर्यंत विजय मार्च

ही तिरंगा विजय जल्लोष रॅली दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून सुरू होऊन प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाणार आहे. तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

Mumbai Property Tax : मालमत्ता कराचे बिल आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवर; BMC ची नवी डिजिटल सेवा लवकरच सुरू

वाशिममध्ये मध्यरात्री भीषण आग! काही मिनिटांत चार दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, VIDEO

Mumbai : सभागृहातील आसन व्यवस्था उत्कृष्ट; तीन वर्षांत एकही तक्रार नाही

गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा; सावंतवाडी रोड स्थानकावर तीन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा