Mumbai : समुद्रातील तरंगता कचरा काढणार इलेक्ट्रिक बोट; गेटवे ऑफ इंडिया व बधवार पार्क येथे मानवरहित बोट कार्यरत 
मुंबई

Mumbai : समुद्रातील तरंगता कचरा काढणार इलेक्ट्रिक बोट; गेटवे ऑफ इंडिया व बधवार पार्क येथे मानवरहित बोट कार्यरत

समुद्रकिनारा आणि लगतचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

Swapnil S

मुंबई : समुद्रकिनारा आणि लगतचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. समुद्रातील तरंगता कचरा संकलित करण्यासाठी भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) आणि बधवार पार्क परिसरात मानवरहित विद्युत नाव (इलेक्ट्रिक बोट) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या नावेच्या माध्यमातून या परिसरातून रोज सुमारे ८० ते ९० किलो तरंगता कचऱ्याचे संकलन केले जाते.

बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) स्वच्छता राखण्यासाठी तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर, उपायुक्त (परिमंडळ-१) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक आयुक्त (ए विभाग) गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेच्या ‘ए’ विभागातील भारताचे प्रवेशद्वार आणि बधवार पार्क परिसरात दोन मानवरहित विद्युत नाव (इलेक्ट्रिक बोट) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

ही नाव पूर्णपणे विद्युत ऊर्जेवर चालणारी असून पर्यावरणपूरक आहे. यामध्ये वाहन वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (व्हीटीएमस) आणि जागतिक स्थाननिर्धारण प्रणाली (जीपीएस) असून याद्वारे नावेचे मार्गक्रमण, कार्यक्षेत्र आणि सुरक्षिततेबाबत नियंत्रण करता येते. समुद्रातील विविध प्रकारचा तरंगता कचरा संकलनाचे कार्य ही नाव अधिक प्रभावी आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यास सक्षम आहे.

सागरी पर्यावरण, जलचरांना कोणताही धोका नाही

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, वेष्टने आणि इतर कचरा समुद्राच्या पाण्यात तरंगताना आढळतो. हा कचरा मानवी प्रयत्नांनी गोळा करणे अत्यंत कठीण आणि वेळखाऊ काम होते. यावर उपाय म्हणून पालिकेच्या ए विभागाने थेट समुद्रात उतरून कचरा गोळा करणाऱ्या या दोन मानवरहित इलेक्ट्रिक बोटी कार्यान्वित केल्या आहेत. या बोटी पूर्णपणे विजेवर चालत असल्यामुळे डिझेल किंवा पेट्रोलवर चालणाऱ्या इतर जहाजांप्रमाणे सागरी पर्यावरणाला आणि जलचरांना कोणताही धोका निर्माण होत नाही.

मेट्रोमुळे मीरा, भाईंदर लोकल प्रवाशांमध्ये मोठी घट; मीरा रोडची गर्दी ४० लाखांवरून २८ लाखांवर

सहा तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ९९३ कोटींचा निधी मंजूर; तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समिती बैठकीत निर्णय

काटकसर करा! सरकारी बँका, विमा कंपन्यांना अर्थ मंत्रालयाचे आदेश

शिंदे सेना-भाजपमध्ये ठाण्यात संघर्ष पेटला; पक्षीय वाद नसल्याचा शिंदे सेनेचा दावा

नवी मुंबईत ९२५ एकरांवर लॉजिस्टिक पार्क उभारणार; सिडकोकडून पहिल्या टप्प्यासाठी निविदा जाहीर