मुंबईत ३३ ठिकाणी फ्लड गेट; पूरस्थितीचा इशारा देणारी सेन्सर यंत्रणा उभारणार; २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मुंबईत ३३ ठिकाणी फ्लड गेट; पूरस्थितीचा इशारा देणारी सेन्सर यंत्रणा उभारणार; २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

दरवर्षी मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मुंबई महापालिकेने १३ हजार कोटींचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा तयार केला आहे. या आराखड्यांतर्गत मुंबईत आणखी ३३ ठिकाणी फ्लड गेट आणि पंपिंग यंत्रणा उभारली जाणार असून, नद्या व प्रमुख नाल्यांमध्ये पाण्याची पातळी मोजणारी अत्याधुनिक सेन्सर प्रणाली बसवण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : दरवर्षी मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मुंबई महापालिकेने १३ हजार कोटींचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा तयार केला आहे. या आराखड्यांतर्गत मुंबईत आणखी ३३ ठिकाणी फ्लड गेट आणि पंपिंग यंत्रणा उभारली जाणार असून, नद्या व प्रमुख नाल्यांमध्ये पाण्याची पातळी मोजणारी अत्याधुनिक सेन्सर प्रणाली बसवण्यात येणार आहे.

या प्रकल्पाच्या कामांना ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार असून ऑक्टोबर २०२९ पर्यंत संपूर्ण आराखडा पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. महत्त्वाकांक्षी पूरनियंत्रण प्रकल्पाला केंद्र सरकारकडून तत्त्वतः मंजुरी मिळाली असून, निधीसाठी प्रस्तावही केंद्राकडे पाठवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत दिली होती.

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत एका दिवसात तब्बल ९४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. या महापुरानंतर सत्यशोधन समितीच्या शिफारशीनुसार ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत पर्जन्य जलवाहिन्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, आरसीसी वाहिन्या, भूमिगत नाल्यांचे पुनर्वसन आणि पम्पिंग स्टेशन उभारणीसह अनेक कामांवर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या अपेक्षित प्रमाणात कमी झालेली नाही.

नव्या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात माहुल आणि मोगरा पम्पिंग स्टेशनची उभारणी, तसेच मिठी नदीतील तिसऱ्या टप्प्यातील १८ फ्लड गेट, सेवा रस्ते आणि संरक्षण भिंतींची कामे हाती घेतली जाणार आहेत. याशिवाय मुंबईतील आणखी ३३ ठिकाणी फ्लड गेट व पम्पिंग यंत्रणा उभारण्यात येणार आहे. नाल्यांमध्ये कचरा जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी काही ठिकाणी आठ ते दहा फूट उंच संरक्षक जाळ्या बसवण्यात येतील. तसेच शहरातील ३५० पूरप्रवण ठिकाणांवर विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत.

पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढणार

सध्या मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्या ताशी सुमारे ५० मिमी पावसाचा निचरा करण्याच्या क्षमतेच्या आहेत. नव्या आराखड्याद्वारे ही क्षमता १०० ते १२० मिमी पावसापर्यंत वाढविण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात पाणी साचण्याचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे.

पूरस्थितीचा इशारा देणारी स्मार्ट सेन्सर प्रणाली

मिठी, दहिसर आणि पोईसर नद्यांसह प्रमुख नाल्यांमध्ये पाण्याची पातळी मोजणारे सेन्सर बसवले जाणार आहेत. पाण्याची पातळी धोक्याच्या मर्यादेजवळ पोहोचताच, महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला तत्काळ अलर्ट मिळेल किंवा सायरनद्वारे सूचना दिली जाईल. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणांना वेळेत प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. सध्या मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर सात ठिकाणी ही यंत्रणा कार्यरत असून, नव्या प्रकल्पांतर्गत तिचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जाणार आहे.

अंधेरी सबवेसाठी विशेष उपाय

दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या अंधेरी सबवेचाही या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. सबवेमध्ये पाणी साचू नये यासाठी तीन पाणी साठवण टाक्या उभारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पाण्याचा निचरा जलद होण्यासाठी पर्यायी पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचाही महापालिका विचार करत आहे. त्यामुळे अंधेरी सबवे कायमस्वरूपी पूरमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BEST ला जाहिरातींचा आधार; दोन वर्षांत ११४.१३ कोटींचा महसूल जमा

एसटीच्या पदोन्नती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ; चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

Mumbai : हरित क्षेत्रातील सुविधांसाठी मोजा पैसे! कोस्टल रोड प्रकल्पातील ७० हेक्टर हरितक्षेत्र रिलायन्स फाऊंडेशन विकसित करणार

हा आठवडा निर्णायक! शेअर बाजाराची नेमकी दिशा ठरणार; सोने-चांदी दराची कसोटी लागणार

मुंबईत तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस