संग्रहित छायाचित्र 
मुंबई

Mumbai : १ फेब्रुवारीपासून मुंबईत नवीन वाहतूक नियम; कोंडी कमी करण्यासाठी निर्णय, कोणत्या वाहनांना परवानगी? कोणाला नो एंट्री?

मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी १ फेब्रुवारीपासून शहरात नवीन वाहतूक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Krantee V. Kale

मुंबई : मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी १ फेब्रुवारीपासून शहरात नवीन वाहतूक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांनुसार शहरात जड वाहनांच्या प्रवेशावर वेळेचे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

पीक अवर्समध्ये जड वाहनांना बंदी

नव्या आदेशानुसार,

  • सकाळी ८ ते ११

  • सायंकाळी ५ ते रात्री ९

या वेळेत मुंबईत जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. या वेळा वाहतुकीच्या दृष्टीने सर्वाधिक गजबजलेल्या असल्याने मोठ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढतो आणि कोंडी तीव्र होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

दक्षिण मुंबईत अधिक कठोर नियम

दक्षिण मुंबईत (साऊथ मुंबई) नियम आणखी कडक असणार आहेत.

  • सकाळी ७ ते रात्री १२ या वेळेत सर्व जड वाहनांना पूर्ण बंदी

  • फक्त अत्यावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना परवानगी

  • जड वाहनांना प्रवेश फक्त रात्री १२ ते सकाळी ७ या वेळेतच मिळणार

लक्झरी बसनाही या भागात बंदी राहणार आहे, मात्र अत्यावश्यक सेवा देणारी वाहने अपवाद असतील.

ईस्टर्न फ्रीवेवर दिवसरात्र बंदी

-मुंबईच्या ईस्टर्न फ्रीवेवर जड वाहनांना पूर्णतः बंदी राहील.
-फक्त बस सेवा याला अपवाद असणार आहेत.

कोणती वाहने सुरू राहतील?

खालील वाहनांना बंदीतून सूट देण्यात आली आहे –

  • भाजीपाला, दूध, ब्रेड, बेकरी पदार्थ

  • पिण्याचे पाणी

  • पेट्रोल, डिझेल, रॉकेल

  • रुग्णवाहिका

  • शालेय बस

  • शासकीय व निमशासकीय वाहने

लक्झरी बसना शहरात परवानगी असेल, मात्र दक्षिण मुंबईत नाही.

पार्किंग नियमही कडक

जड वाहनांना –

  • फक्त खाजगी, भाड्याच्या किंवा अधिकृत पे- अँड-पार्किंगमध्येच वाहन लावता येईल

  • सार्वजनिक रस्त्यांवर पार्किंगला मनाई

  • पाणी पुरवठा ठिकाणांजवळ फक्त दोन पाण्याचे टँकर थांबू शकतील

वाहतूक पोलिसांचे स्पष्टीकरण

“हळू गतीने चालणारी जड वाहने पीक अवर्समध्ये वाहतूक ठप्प करतात. या नियमांचा उद्देश सामान्य नागरिकांचा प्रवास सुकर करणे हा आहे.” असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

ट्रान्सपोर्ट संघटनांचा विरोध

मात्र, या निर्णयावर ट्रान्सपोर्ट संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष बाल मलकित सिंग यांनी सांगितले की, “या बंदीमुळे दक्षिण मुंबईतील कामकाजावर परिणाम होईल. केवळ अत्यावश्यक वाहनांनाच परवानगी दिल्यास भ्रष्टाचाराला वाव मिळू शकतो. ट्रक हे फिरण्यासाठी नसून गरजेच्या कामासाठीच रस्त्यावर असतात.”

दरम्यान, वाढती वाहनसंख्या आणि सुरू असलेली मोठी पायाभूत कामे लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

टाटा सन्सची AGM आज होणार नाही! वार्षिक सर्वसाधारण सभा तहकूब होण्याची शक्यता

पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला! भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री; गिरीश महाजनांकडे नाशिकची धुरा

FDA ला न्यायालयाचा दणका; पुण्याच्या मिठाईच्या दुकानाचा परवाना पूर्ववत, ५ लाख रुपयांची भरपाई देण्याचेही निर्देश

Mumbai : गोरेगाव-मुलुंड २० मिनिटांत; जीएमएलआर प्रकल्पात ‘तुळशी’ खोदणार बोगदा, नॅशनल पार्कखाली भूमिगत बोगदा

राज्यातील शैक्षणिक संस्थांची चौकशी करा! SIT ला उच्च न्यायालयाचे निर्देश; राजकीय संबंध असलेल्या संस्थेची चौकशीतून सुटका नको