मुंबई : गोपाळकालाच्या दिवशी शनिवारी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० हजारांहून अधिक वाहनांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १ कोटी रुपयांहून अधिकचा दंड आकारण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईत गोपाळकाला जोरदार साजरा करतात. शनिवारी मुंबईत अनेक गोविंदा पथकांनी उंचच्या उंच मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडल्या. यावेळी ही गोविंदा पथके दुचाकीसह इतर वाहनांनी फिरत होते. यावेळी वाहतूककोंडी होऊ नये म्हणून स्थानिक पोलिसांसह मुंबई वाहतूक पोलीस रस्त्यावर तैनात होते. पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावला. शनिवारी दिवसभरात एकूण १०,०५१ ऑन-द-स्पॉट ई-चलन काढण्यात आले असून त्यामध्ये १,१३,५७,२५० रुपयांचा दंड आकारला गेला आहे.
हेल्मेटशिवाय वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, एका दुचाकीवर तीन जण आणि वेगाची मर्यादा ओलांडणे यासाठी हा दंड आकारण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईच्या विविध भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आणखी ई-चलन काढण्यात येतील, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
शनिवारी मुंबईसह राज्यभरात गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत या दिवशी उंचच्या उंच थर रचतात. त्यामुळे या दिवशी मुंबई हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. यंदा मुंबईतील दोन पथकांनी दहा थरांचा मानवी मनोरा रचत ऐतिहासिक कामगिरी केली. दरम्यान वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी वॉच ठेवला होता. यावेळी दिवसभरात १० हजारांहून अधिक गोविंदांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले. अशा वाहन चालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यावेळी दिवसभरात तब्बाल एक कोटीहून अधिकचा दंड आकारण्यात आला आहे.
मुंबई, ठाण्यात ३०० गोविंदा जखमी
मुंबई आणि शेजारील ठाण्यात दहीहंडी उत्सवात शनिवारी दोन जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक जण जखमी झाले, अशी माहिती रविवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईतील ३१८ जखमींपैकी केवळ २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतरांना शनिवारी उपचार करून घरी सोडण्यात आले, असे सांगण्यात आले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक १३५ जखमी मुंबई विभागात झाले आहेत. त्यापाठोपाठ पश्चिम उपनगरात १११ गोविंदांना दुखापत झाली, तर पूर्व उपनगरात ७२ जण जखमी झाले.
मृतांमध्ये ३२ वर्षीय जगमोहन शिवकिरण चौधरी याचा समावेश असून मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर येथे दहीहंडी बांधताना त्याचा पडून मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत घाटकोपर येथे १४ वर्षीय मुलाचा शनिवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला.
शेजारच्या ठाणे शहरात २२ गोविंदा थर रचताना जखमी झाले, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आली.