मुंबई : मुंबई महापालिकेने आता उद्याने व मोकळ्या मैदानांखाली भूमिगत पार्किंग सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. शहर व उपनगरांतील एकूण ३२ उद्याने व मोकळ्या जागांची यासाठी पाहणी करण्यात आली असून, या प्रकल्पांच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी विशेष सल्लागाराची नियुक्ती केली आहे. यापैकी दोन ठिकाणांवर भूमिगत पार्किंग उभारण्याबाबत जवळपास निश्चित झाल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कुलाबा-फोर्ट परिसरातील पार्किंगची वाढती गरज लक्षात घेऊन हुतात्मा चौकातील अप्सरा पेन शॉपजवळ भूमिगत रोबोटिक पार्किंग प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याच धर्तीवर शहरातील उद्याने आणि मोकळ्या मैदानांखाली बहुस्तरीय भूमिगत पार्किंग उभारता येईल का, याचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे.
महापालिकेच्या प्राथमिक पाहणीत समाविष्ट असलेल्या ३२ जागांपैकी बहुतांश जागा पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये आहेत. मात्र कोणत्या दोन ठिकाणांची निवड अंतिम टप्प्यात आहे, याबाबत महापालिकेकडून कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. या पार्किंग प्रकल्पांमध्ये बहुस्तरीय तळमजले असतील आणि वरच्या स्तरावर उद्यान किंवा मैदानाचा मूळ वापर कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात मुंबईतील पार्किंग समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून भूमिगत पार्किंगची गरज अधोरेखित केली होती. त्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी प्रत्येक महापालिका वॉर्डमध्ये टप्प्याटप्याने भूमिगत पार्किंग उभारण्याचा आराखडा असल्याचे सांगितले होते. मुंबईतील सुमारे २७ ठिकाणी अशा सुविधा उभारण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. दादर येथील वसंत स्मृतीमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीतही या विषयावर चर्चा झाल्याचे समजते.
हुतात्मा चौक भूमिगत पार्किंग - चार तळमजले, १९४ हून अधिक वाहनांची क्षमता.
वरळी इंजिनीअरिंग हब पार्किंग - २० मजली पार्किंग टॉवर आणि दोन तळमजले.
एकूण क्षमता : सुमारे ६४० वाहनांसाठी पार्किंग