

पुण्यातील मुकुंदनगर परिसरात २९ वर्षीय आयटी इंजिनिअर विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पायल झांबरे असे मृत महिलेचे नाव असून, तिचा सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचा आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. पायल ही पुण्यातील प्रसिद्ध झांबरे पॅलेसच्या मालकांच्या कुटुंबातील सून असल्याची माहिती आहे. सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पायल आत्महत्या करू शकत नाही, तिचा घातपात झाला असावा, असा दावा तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती अक्षय झांबरे याला ताब्यात घेतले असून, सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पायल झांबरेच्या मृत्यूचे नेमके प्रकरण काय?
पायलच्या माहेरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर तिचा पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक तसेच शारीरिक छळ केला जात होता. प्रत्येक दिवाळीत माहेरून ५ ते १० तोळे सोने आणण्याची मागणी केली जात असल्याचा आरोप आहे. पायलचे माहेरचे कुटुंब शेतकरी असून, आर्थिक अडचणी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांनी थोडा वेळ मागितला होता. मात्र, तरीही पायलचा छळ सुरूच असल्याचे कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे.
पायल २०२२ मध्ये गर्भवती असताना मुलगाच व्हावा, यासाठी तिच्यावर दबाव टाकून मानसिक त्रास दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ३० मार्च २०२३ रोजी पायलने मुलीला जन्म दिल्यानंतर सासरच्या मंडळींनी रुग्णालयात येऊन वाद घातला. तसेच पायल किंवा बाळाची जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मृत्यूपूर्वी पायलचा मेसेज
पायलचा मृतदेह पुण्यातील मुकुंदनगर परिसरातील 'अक्षय हाइट्स' सोसायटीतील एका जुन्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मृत्यूपूर्वी पायलने काही व्यक्तींना मेसेज पाठवला होता. 'मला काही झाल्यास सासू जबाबदार असेल', असा आशय त्या मेसेजमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.
सकाळी सुमारे ७ वाजता सासरच्या मंडळींनी पायलच्या माहेरच्या कुटुंबीयांना फोन करून ती घरातून निघून गेल्याचे सांगितले होते. त्यानंतर माहेरचे कुटुंबीय तिच्या शोधासाठी पोहोचले. यावेळी पायलचा मृतदेह जवळच असलेल्या जुन्या फ्लॅटमध्ये आढळला. घटनास्थळी आत्महत्येची चिठ्ठी आढळली नसल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
'पायल आत्महत्या करू शकत नाही' - माहेरच्या कुटुंबीयांचा आरोप
पायल उच्चशिक्षित होती आणि तिचा स्वभाव शांत होता. त्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू शकत नाही, असा ठाम दावा तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. पायलचा मृत्यू ही आत्महत्या नसून घातपात असण्याची शक्यता असल्याचा संशयही नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणात हत्या आणि आत्महत्या या दोन्ही शक्यता तपासून सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पती पोलिसांच्या ताब्यात; सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा
या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पायलचा पती अक्षय झांबरे, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हुंड्यासाठी छळ करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे यांसारख्या आरोपांनुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी पती अक्षयला ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पायलचा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.