Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

घाटकोपरमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत पालिकेचे कंत्राटी कर्मचारी विक्रम भालेकर यांचा मृत्यू झाला. त्यांनी स्वतः बसवलेल्या सीसीटीव्हीतच अपघात कैद झाला. आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.
Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू
Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू
Published on: 

मुंबई : कुटुंबाच्या सुखासाठी दिवसरात्र कष्ट करणाऱ्या एका तरुणाचा भरधाव वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, त्याने स्वतः बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातच त्याच्या अपघाताचे क्षण कैद झाले. मात्र, या फुटेजमध्ये वाहनाचा क्रमांक स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताला जबाबदार असलेला चालक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. घाटकोपर पूर्व येथे रविवारी (दि. १०) ही घटना घडली. या अपघातात मुंबई महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी विक्रम शांताराम भालेकर (३६) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि सहा वर्षांची मुलगी आहे.

नेमकं काय घडलं?

'मिड-डे'ने दिलेल्या वृत्तानुसार, विक्रम भालेकर हे मुंबई महापालिकेच्या स्वच्छता वाहनांमधील बॅटरी आणि इतर उपकरणांच्या देखभालीचं काम करत होते. रविवारी, १० ऑक्टोबर रोजी रात्रीच्या ड्युटीदरम्यान ते काही वेळ विश्रांती घेण्यासाठी थांबले होते.

घाटकोपर पूर्वेकडील पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यावर, अदानी टॉवरजवळ ते रस्त्याच्या दुभाजकावर बसले होते. त्याचवेळी एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. वाहनाने त्यांना सुमारे १० ते १५ फूट फरफटत नेलं. त्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी विक्रम मुख्य रस्त्यापासून दूर बसले होते. तरीही वाहनाने त्यांना धडक दिल्याने कुटुंबीयांनी रस्त्यावरील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

स्वतः बसवलेल्या कॅमेऱ्यातच अपघात कैद

या दुर्घटनेतील सर्वांत दुर्दैवी बाब म्हणजे विक्रम यांनी काही दिवसांपूर्वीच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला होता. त्याच कॅमेऱ्यात त्यांच्या आयुष्यातील अखेरचे क्षण कैद झाले आहेत. मात्र, फुटेज अस्पष्ट असल्याने पोलिसांना अपघाताला कारणीभूत असलेल्या वाहनाचा क्रमांक किंवा वाहनाची कंपनीही ओळखता आलेली नाही. वाहनचालकाची ओळख पटवू शकेल असा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही अद्याप समोर आलेला नाही.

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू
Virar : जीवदानी देवीच्या दर्शनाला निघालेल्या मायलेकीवर काळाचा घाला! टँकरच्या धडकेत आईसह ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

कुटुंबासाठी करत होते अनेक कामं

विक्रम हे तीन भावांपैकी सर्वांत लहान होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि सहा वर्षांची मुलगी आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती.

विक्रम यांचे भाऊ जितेंद्र आणि योगेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेतील कंत्राटी नोकरीसोबतच विक्रम इलेक्ट्रिशियन, वायफाय ऑपरेटर आणि गणपतीच्या मूर्तींच्या सजावटीचंही काम करत होते. अनेकदा त्यांना सकाळ, संध्याकाळ आणि रात्री अशा वेगवेगळ्या वेळांत काम करावं लागत असे. विक्रम अत्यंत कष्टाळू आणि मदतशील स्वभावाचे होते. कुटुंबाला चांगलं आयुष्य मिळावं, यासाठी ते सतत मेहनत करत होते, असं त्यांच्या भावांनी सांगितलं.

मृत्यूच्या आदल्या दिवशी केली होती देवीच्या मंडपाची सजावट

विक्रम यांना गणपती आणि देवीच्या मूर्तींची सजावट करण्याची विशेष आवड होती. मूर्तींवर आकर्षक खडे लावून सजावट करणं त्यांना आवडायचं. मृत्यूच्या आदल्या दिवशीही त्यांनी परिसरातील देवीच्या मंडपाच्या सजावटीसाठी मदत केली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी झालेल्या अपघाताने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अपघातानंतर घटनास्थळी विक्रम यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहणाऱ्या एका सहकाऱ्याने त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू
Mumbai : नाहूरमध्ये ४८ व्या मजल्यावरून कोसळून दोन कामगारांचा मृत्यू; केबल तुटल्याने भीषण दुर्घटना

पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलीचा आधार हरपला

विक्रम हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे पत्नी आणि लहान मुलीसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

“विक्रमच्या सहा वर्षांच्या मुलीचा आणि पत्नीचा एकमेव आधार हिरावला गेला आहे. आम्हाला विक्रमसाठी न्याय आणि त्याच्या कुटुंबासाठी नुकसानभरपाई हवी आहे,” अशी मागणी त्यांचे भाऊ जितेंद्र यांनी 'मिड-डे'शी बोलताना केली.

आरोपी चालकाच्या शोधासाठी चार विशेष पथकं

या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) आणि २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४(ए), १३४(बी) आणि १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी चार विशेष पथकं स्थापन करण्यात आली आहेत. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असल्याची माहिती पंतनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक लता सुतार यांनी दिली. फुटेज अस्पष्ट असलं तरी सर्व शक्यता तपासून संबंधित वाहन आणि चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

(इंग्रजीत बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in