हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद

Ludhiana DV Case : नोव्हेंबर २०२५ मध्ये ट्विंकलचा रितीश शर्मा याच्याशी विवाह झाला. रितीश हा आरोग्य क्षेत्रात काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. रितीशचं हे पहिलं, तर ट्विंकलचं दुसरं लग्न आहे...
हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद
हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद(X - व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
Published on: 

लुधियाना : पंजाबमधील लुधियाना येथे हुंड्याच्या मागणीवरून पत्नीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री जस्सियान ग्रीन एन्क्लेव्ह परिसरात ही घटना घडली. महिंद्रा थार एसयूव्ही आणि मोटारसायकलची मागणी पूर्ण न केल्याने पती रितीश शर्मा याने पत्नी ट्विंकलला मारहाण केल्याचा आरोप आहे. पतीने तिचे केस धरून रस्त्यावर फरफटवलं आणि लाथाही मारल्या. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून, ट्विंकलने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

थार अन् बाईकसाठी पत्नीला मारहाण, CCTV मध्ये घटना कैद

समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका निवासी परिसरातील रस्त्यावर पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याचं दिसतं. यावेळी पतीने पत्नीला मारहाण केली, तिचे केस धरून तिला रस्त्यावर ओढलं आणि ती खाली पडल्यानंतरही लाथा मारल्याचा आरोप आहे. महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजारी घराबाहेर आले. त्यांनी हस्तक्षेप करत दोघांना वेगळं करण्याचा आणि महिलेला मदत करण्याचा प्रयत्न केला.

ट्विंकलने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मोटारसायकलच्या मागणीवरून दोघांमध्ये वाद झाला होता. पतीने घरातही मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी ती शेजाऱ्यांच्या घरी गेली. मात्र, पतीने तिचा पाठलाग करून घराबाहेर पुन्हा मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

पत्नीच्या कार्डवरून ५० हजारांचं कर्ज घेतल्याचा आरोप

माध्यमांच्या वृत्तानुसार, ट्विंकल लुधियानातील समराळा चौकाजवळ सलून चालवते. नोव्हेंबर २०२५ मध्ये तिचा रितीश शर्मा याच्याशी विवाह झाला. रितीश हा आरोग्य क्षेत्रात काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. रितीशचं हे पहिलं, तर ट्विंकलचं दुसरं लग्न आहे. ट्विंकलच्या आधीच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान दोघांची ओळख झाल्याची माहिती आहे.

ट्विंकलच्या आरोपानुसार, लग्नानंतर सुमारे तीन महिन्यांनी दोघांच्या नात्यात तणाव निर्माण होऊ लागला. रितीशने तिच्या कार्डचा वापर करून ५० हजार रुपयांचं कर्ज घेतल्याचा आरोप तिने केला आहे. त्यानंतर त्याने महिंद्रा थार एसयूव्हीची मागणी सुरू केली. ट्विंकल सलूनमधून त्याच्यापेक्षा जास्त कमाई करते, यावरूनही तो तिला टोमणे मारत असल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे.

हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद
Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक; मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून घातल्या बेड्या

नवरात्रीपासून मोटारसायकलची मागणी, नकार दिल्याने वाद

ट्विंकलच्या म्हणण्यानुसार, नवरात्रीत पतीने मोटारसायकलची मागणी सुरू केली. मात्र, ही मागणी पूर्ण करण्यास तिने नकार दिला. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी एका मध्यस्थानेही प्रयत्न केल्याचं वृत्त आहे. मात्र, मोटारसायकलच्या मागणीवरून झालेल्या वादाचं रूपांतर मारहाणीत झाल्याचा आरोप ट्विंकलने केला आहे.

भावालाही मारहाण झाल्याचा आरोप

या घटनेनंतर ट्विंकलचा भाऊ गौरव यानेही मारहाणीचा आरोप केला आहे. शेजाऱ्यांकडून घटनेची माहिती मिळाल्यानंतर तो वडिलांसोबत बहिणीच्या घरी पोहोचला होता. त्यावेळी आपल्यावरही हल्ला करण्यात आल्याचा दावा गौरवने केला आहे. या हल्ल्यात डोक्याला दुखापत झाल्याने टाके घालावे लागल्याचं त्याने सांगितलं. याप्रकरणी त्यानेही पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

ट्विंकलने पतीविरोधात तक्रार दाखल करत सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, जगतपुरी पोलीस चौकीतील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, या प्रकरणात संबंधितांचे जबाब नोंदवण्यात आले असून, महिलेचा वैद्यकीय अहवालही प्राप्त झाला आहे. लवकरच एफआयआर दाखल करण्यात येईल, असंही अधिकाऱ्याने सांगितल्याचं वृत्त आहे.

हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद
Video : मित्रानेच केला गेम! फेसबुक किंग बंटी दीक्षितचा निर्घृण खून; आधी कारने स्कूटरला उडवलं, नंतर...

दरम्यान, पोलिसांकडून कारवाई करण्यास विलंब झाल्याचा आरोप ट्विंकलने केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पतीविरोधातील आरोपांची चौकशी केली जात आहे. हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in