मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राची (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी किमान पात्रता धारकांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. तसेच दुहेरी पदवीचा पर्याय उपलब्ध दिला आहे.
दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रात पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबवली जात आहे. येथे पदवी स्तरावरील बीए (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी, आणि इंग्रजी) या विषयांचा समावेश आहे. बीकॉम ( कॉमर्स, अकाऊंटन्सी आणि बीझनेस मॅनेजमेंट), बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचा समावेश असून या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केले जात आहेत. तसेच पदव्युत्तर स्तरावरील इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क, तर एम. कॉम. (ऍडव्हान्स अकाऊंटन्सी), एम. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट), एम.एस्सी. (गणित) एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र) एमएमएस, एमसीए या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युअट डिप्लोमा इन फायन्साशिएल मॅनेजमेंट (पीजीडीएफएम) व डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट (डीएसएम) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेशही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविले जात आहेत. दुहेरी पदवीचा पर्यायही दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया https://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेत स्थळावरून करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंबधातील सर्व तपशील विद्यापीठाच्या https://cdoe.uom.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सीडीओईमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांसाठी तज्ज्ञ व अनुभवी पूर्णवेळ प्राध्यापक या संस्थेत उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही अशा किमान पात्रता धारक विद्यार्थ्यांना दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रात उपलब्ध करून दिली जात आहे. सीडीओईची चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून नुकतेच पालघर येथे विभागीय केंद्र सुरू केले.