Mumbai : ... तर टँकरने पाणीपुरवठा करा! पाणीकपातीची अंमलबजावणी समसमान पद्धतीने करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश (Photo-X/@mybmc)
मुंबई

Mumbai : ... तर टँकरने पाणीपुरवठा करा! पाणीकपातीची अंमलबजावणी समसमान पद्धतीने करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात घट होत असल्याने १५ मे पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे, असे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात घट होत असल्याने १५ मे पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे, असे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी सांगितले.

पाणीकपातीची अंमलबजावणी सर्व भागांमध्ये समसमान पद्धतीने करावी. पाणीकपातीमुळे काही प्रमाणात पाणीपुरवठ्यावर परिणाम होणे अपेक्षित असले, तरी टोकावरील वस्त्या, उंचावरील भाग किंवा अन्य संवेदनशील क्षेत्रांमध्ये १० टक्क्यांपेक्षा अधिक तुटवडा जाणवत असल्यास, तेथील नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी टँकरद्वारे अतिरिक्त पाणीपुरवठा करावा, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरात १५ मे पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर, प्रत्यक्ष कार्यस्थळी कार्यरत जल अभियंता विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, दुय्यम अभियंता व सहाय्यक अभियंता यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी महापालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी उपस्थित दुय्यम अभियंता व सहाय्यक अभियंता यांच्याशी संवाद साधला. उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे, जल अभियंता दिलीप पाटील उपस्थित होते.

तक्रारींवर तातडीने कार्यवाही करा!

पाणीकपातीच्या कालावधीत संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवावे. लोकप्रतिनिधी, नगरसेवक, स्थानिक रहिवासी यांच्याशी समन्वय साधावा. पाणी वितरण व्यवस्थेबाबत त्यांना वेळोवेळी अद्ययावत माहिती द्यावी तसेच भौगोलिक परिस्थिती, उद्भवणाऱ्या अडचणी व तक्रारी, निराकरणासाठी जल अभियंता विभागामार्फत राबवण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून द्यावी. पाणीपुरवठ्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून त्यांचा जलद निपटारा करावा व त्यासंदर्भातील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले.

कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याचे नियोजन करा!

जून महिना सुरू होऊनही अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यासच जलसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पालिका यंत्रणेने सतर्क राहून पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा. पाणीकपात लागू असताना पाणीचोरी व पाणीगळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. अधिकृत जळजोड घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे. ज्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो त्या ठिकाणी कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना बांगर यांनी दिल्या.

सरासरीपेक्षा कमी पाऊस

जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे, जलवाहिन्यांचे सक्षमीकरण करण्याची कामे पावसाळ्यानंतर हाती घेण्यात यावीत. यासाठी आवश्यक नियोजन, तांत्रिक मंजुरी व निविदा प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करावी. संबंधित कामांचे कार्यादेश १५ सप्टेंबरपर्यंत निर्गमित करून १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात यावी. ही कामे निश्चित कालमर्यादेत व उच्च दर्जाची पूर्ण होतील, यासाठी संबंधित विभागाने नियमित देखरेख व समन्वय राखावा. 'एल निनो'च्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले.

काटकसरीने पाणी वापरा!

सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा अपव्यय कोणत्याही परिस्थितीत टाळावा तसेच विशेषतः मोठ्या गृहनिर्माण संस्था व निवासी संकुलांनी आपल्या परिसरात पाणीपुरवठ्यात कपात करू नये, असा आग्रह करू नये. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा समाधानकारक होईपर्यंत परिस्थिती गंभीर राहणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बांगर यांनी केले आहे.

डिझेल विक्रीवर मर्यादा! दिवसाला मिळणार केवळ २०० लिटर

Latur : सरकारने बैल दिला की थट्टा केली? औत लावताच आजारी बैलाने मान टाकली, लातूरच्या शेतकऱ्याची नव्या बैलाची मागणी

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री; कायदेशीर लढाईत विशेष सरकारी वकील म्हणून झाली नियुक्ती, बड्या नेत्यांचे धाबे दणाणले

Solapur : शेअर मार्केटच्या नादाने वाताहात; कर्जबाजारी मुख्याध्यापकाची कुटुंबासह आत्महत्या

नाशिक टीसीएस प्रकरणात ‘इस्लाम पार्टी’ची एन्ट्री; न्यायालयात दिला वकील, संशयितांना पुरवली जात आहे कायदेशीर मदत