Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क 
मुंबई

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबईतील विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाने संपूर्ण परिसराची तपासणी केली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.

Mayuri Gawade

मुंबईत सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच गुरुवारी (दि. १२) सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली. विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली. या धमकीनंतर पोलिसांनी तातडीने संपूर्ण परिसरात सुरक्षा तपासणी सुरू केली.

धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी विधान भवन परिसरात मोठी तपासणी मोहीम हाती घेतली. बॉम्ब शोधक (Bomb Detection and Disposal Squad) पथकांसह श्वान पथकही तपासासाठी तैनात करण्यात आले. इमारत आणि आसपासच्या परिसराची कसून तपासणी करण्यात आली.

सुरक्षेच्या कारणास्तव कर्मचाऱ्यांना बाहेर काढले

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तपासणी सुरू असताना सुरक्षेच्या उपाययोजनेचा भाग म्हणून विधानभवन परिसरातील कर्मचारी आणि अधिकारी यांना काही काळासाठी बाहेर काढण्यात आले. दरम्यान, सुरक्षा पथकांनी संपूर्ण परिसराची सखोल तपासणी केली.

राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती

गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, "आज सकाळी विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आला होता. त्यानंतर बॉम्ब शोध आणि नाशक पथकाने इमारतीची सखोल तपासणी केली. तपासणीदरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. अधिवेशन साधारणतः सकाळी १० नंतर सुरू होत असल्याने त्या वेळी परिसरात फारसे लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते."

त्यांनी पुढे सांगितले की, धमकीचा ई-मेल मिळताच पोलिस यंत्रणेने तात्काळ आवश्यक सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या.

ई-मेल बनावट असण्याची शक्यता

सुरक्षा दलांनी विधानभवन आणि लगतच्या परिसराची तपासणी केली. प्राथमिक माहितीनुसार हा ई-मेल बनावट असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दक्षिण मुंबईतील विधान भवनात सध्या महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.

तेल कंपन्यांकडून इंधन गुणवत्ता तपासणीत मोठी वाढ; सोशल मीडियावरील चर्चेची इंधन वितरण कंपन्यांकडून खबरदारी

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Driving Licence : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक होणार? जाणून घ्या नवे नियम

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद