पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर; धरण क्षेत्रात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर; धरण क्षेत्रात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा

वरुणराजाने पाठ फिरवल्याने मुंबईत पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी बांधकाम साईट्स, स्विमिंग पूल या ठिकाणचे नळ कनेक्शन व स्विमिंग पुलचे नळ कनेक्शन कट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : वरुणराजाने पाठ फिरवल्याने मुंबईत पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी बांधकाम साईट्स, स्विमिंग पूल या ठिकाणचे नळ कनेक्शन व स्विमिंग पुलचे नळ कनेक्शन कट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. २५ स्विमिंग पूलचे कनेक्शन कट करण्यात आले असून १०७ बांधकाम साईट्सचे नळ कनेक्शन कट करण्यात आले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात समाधानकारक पाऊस पडत नाही तोपर्यंत नवीन कनेक्शन देणे आणि देण्यात आलेली कनेक्शन कट करण्याची मोहीम सुरुच राहिल, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे.

'अल नि‍नो'मुळे पावसाने ओढ दिल्‍याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाल्याने उपलब्‍ध पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्‍मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्‍या आहेत. याअंतर्गत मुंबईत १५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची बचत सुनिश्चित करण्यासाठी पिण्‍याव्‍यतिरिक्‍त इतर वापरावरही आवश्यक मर्यादा घालण्‍यात आल्या आहेत.

सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्‍यात येणार असून नवीन बांधकामांसाठी दिल्‍या जाणाऱ्या जलजोडणी स्‍थगित करण्यात आल्‍या आहेत. तसेच, सर्व जलतरण तलावांच्‍या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्‍यात येत आहेत. मुंबईत १०८ ठिकाणी बांधकाम साईट्सवर नळ कनेक्शन देण्यात आले, तर ६० स्विमिंग पूललाही नळ कनेक्शन देण्यात आले आहेत.

१ जुलैनंतर मुंबईत पाणीकपातीत वाढ?

वरुणराजाची कृपादृष्टी न झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. सध्या १५ मेपासून मुंबईत पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पाऊस समाधानकारक न झाल्यास १ जुलैनंतर आढावा घेऊन पाणीकपातीत आणखी १० टक्के वाढ करण्याचे नियोजन असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात २४ जून रोजी ७.९४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

२४ जून रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

  • मोडक सागर - २६,३७५

  • तानसा - २,६८४

  • मध्या वैतरणा - २१,२५७

  • भातसा - ५०,२७७

  • विहार - १२,४९९

  • तुळशी - १,७७२

धरणांत पावसाची बरसात

जवळपास महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर मंगळवार रात्रीपासून मुंबई व परिसरात पावसाने हजेरी लावली. धरण क्षेत्रातही तुरळक सरी बरसल्याने तीन हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या २४ तासात सात धरणांमध्ये किमान ५२ मिमी ते २६३ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तलावात पाऊस बरसण्यास सुरुवात झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या सात धरणांमध्ये १,१४,८६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

यंदाची आषाढी वारी जगभर पोहोचणार; डिस्कव्हरी आणि जिओग्राफी वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण

लग्नपत्रिकेत वधूवरांची जन्म तारीख बंधनकारक करण्याचा विचार; बालविवाह रोखण्यासाठीचा उपाय

अवतरला आहे सर्वात शक्तिशाली सुपरकॉम्प्युटर! चीन अव्वल स्थानी, अमेरिकेला टाकले मागे

बोगस डॉक्टरांना रोखण्यासाठी क्यूआर कोड प्रणाली सुरु

मान्सूनने महाराष्ट्र घेतला कवेत; १४ जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’