मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अनेकवेळा जलवाहिनीला गळती लागण्याच्या घटना घडतात. या गळतीदरम्यान, मुंबईकरांच्या हक्काचे सुमारे १५ टक्क्यांहून अधिक पाणी मातीमोल होत असून नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक जलवाहिन्या जमिनीखाली आहेत. जमिनीखालील जलवाहिनीला गळती लागली की अनेकदा त्याचा शोध लागत नाही. एखाद्या परिसरात पाणीपुरवठा कमी झाला की जलवाहिनीला गळती लागल्याची बाब समोर येते. अशा गळती शोधण्यासाठी जल विभागांमध्ये पथके नेमण्यात आली आहेत. याद्वारे गळती शोधून दुरुस्ती केली जाते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जमिनीच्या खाली खूप खोलवर असून त्या जीर्ण झाल्या आहेत. या जलवाहिन्यांमध्ये गळती झाली की अनेकदा त्याचा शोध लागत नाही. त्यामुळे सुमारे १५ टक्क्यांहून अधिक पाणी वाया जाते, अशी माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.
धरणातील संपूर्ण पाणीसाठा वापरात नाही
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात प्रमुख तलावांमधून पाणीपुरवठा होतो. या सात धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता १ लाख ४४ हजार ७३६.३ कोटी लिटर आहे. तरी देखील उन्हाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. दरम्यान, धरणातील संपूर्ण १०० टक्के पाणीसाठा मुंबईकरांच्या वापरात येत नसल्याची बाब समोर आली आहे.