मुंबई

Mumbai : अखेर संप मागे! BMC आयुक्त आणि टँकरचालकांच्या बैठकीनंतर निघाला तोडगा

गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संपाबाबत सकारात्मक चर्चा झाली. टँकरचालकांच्या मागण्यांबाबत यशस्वी तोडगा निघाला असून, मुंबईच्या रस्त्यांवर...

Swapnil S

मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संपाबाबत सकारात्मक चर्चा झाली. टँकरचालकांच्या मागण्यांबाबत यशस्वी तोडगा निघाला असून, मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच टँकर धावताना दिसतील, असे आश्वासन मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीने सचिव राजेश ठाकूर यांनी दिले.

मुंबईतील टँकरचालकांचा संपामुळे व्यापक जनहित लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू करून मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने, आपली बाजू मांडण्यासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची सोमवारी भेट घेतली. या बैठकीत दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर काही वेळाने टँकरचालकांनी संप मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेतून जाहीर केले. त्यामुळे मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच पाणीपुरवठा करणारे खासगी टँकर्स अधिग्रहित करण्याची महानगरपालिका प्रशासनाला आवश्यकता भासणार नाही.

या बैठकीला आयुक्त गगराणी यांच्यासह कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ, तर मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीने सचिव राजेश ठाकूर, उपाध्यक्ष हरबंस सिंग, जीतू शाह, खजिनदार अमोल मांढरे यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य हजर होते.

टँकरचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली. संघटनेच्या मागण्या केंद्र शासनापर्यंत पोहोचवण्यात याव्यात. केंद्रीय भूजल प्राधिकरण यांच्याकडे वेळोवेळी बाजू मांडण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सहाय्य मिळावे, अशी विनंती संघटनेने केली. तसेच मागण्यांचे सविस्तर निवेदन महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सादर केले. टँकरचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गगराणी म्हणाले की, “केंद्रीय भू-जल प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करण्याच्या अनुषंगाने मुंबई पालिकेने बजावलेल्या नोटिसांना १५ जून २०२५ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. तसेच, नियम न पाळल्यास विहीर व कूपनलिका धारकांची मान्यता रद्द करण्याच्या नोटिसा परत घेण्याचे ठरले. मात्र ज्या धारकांनी मान्यताच घेतलेली नाही, त्यांना मान्यता घ्यावी लागेल, हे स्पष्ट करण्यात आले. तसेच केंद्र शासनाशी निगडित मागण्या व बाबी संबंधितांपर्यंत पोहोचविण्यासाठी देखील महानगरपालिकेच्या वतीने संघटनेला प्रशासकीय सहाय्य पुरवले जाईल. मात्र तांत्रिक बाबी या शासनाच्या स्तरावरील असून त्यामध्ये महानगरपालिका प्रशासन हस्तक्षेप करू शकत नाही. मुख्यमंत्री महोदय आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री महोदय यांनी दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे टँकरचालक संघटनेने सारासार विचार करून आपली भूमिका ठरवावी,” असे गगराणी यांनी बैठकीत स्पष्ट केले.

या सविस्तर व सकारात्मक चर्चेनंतर, मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काही तासांचा अवधी मागून घेतला आणि संघटनेची बैठक घेऊन त्याआधारे भूमिका जाहीर करण्यात येईल, ही भूमिका सकारात्मक असेल, असे सांगितले होते. त्यानंतर, असोसिएशनने संप मागे घेत असल्याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

संप मागे, टँकर पाठवले - राजेश ठाकूर

आम्ही आमचा संप मागे घेत आहोत. आम्ही मुंबईला वेठीस धरणार नाही. आम्ही ताबडतोब आमचे टँकर सगळ्या सोसायटींमध्ये पाठवले आहेत. पुन्हा आमच्यावर अशी कारवाई होऊ नये, यामुळे आम्ही आता कोर्टात जाऊन दाद मागणार आहोत, असे वॉटर टँकर असोसिएशनचे राजेश ठाकूर यांनी म्हटले.

यासाठीच टँकरचालकांनी पुकारला होता संप

केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीविरोधात मुंबईतील टँकरचालकांनी संप पुकारला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानंतर महानगरपालिकेने विहीर आणि कूपनलिका धारकांना बजावलेल्या नोटिसांना स्थगिती देण्यात आली. तरीही, टँकरचालक संप मागे घेत नसल्याने, व्यापक जनहित लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू केला होता. अखेर टँकरचालकांनी संप मागे घेतला आहे.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

राज ठाकरेंच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी; मनसेची संतप्त पोस्ट, म्हणाले, "आमच्या पक्षाला...

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास