संग्रहित छायाचित्र 
मुंबई

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात; चार दिवस समुद्रात उंच लाटा उसळणार, समुद्रकिनारे, चौपाट्यांवर न जाण्याचे BMC कडून आवाहन

Swapnil S

मुंबई : गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुंबईत पावसाची दमदार इनिंग सुरू आहे. रविवारी सकाळपासून पावसाने मनसोक्त बॅटिंग सुरू केल्याने मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. रस्त्यांवर पाणी साचल्याने बसमार्गांत बदल करण्यात आले, तर ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम होते, तर तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा धीम्या गतीने सुरू होती. मध्यरात्री विश्रांती घेतल्यानंतर पहाटेपासून पुन्हा एकदा अनेक भागांत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्गात ‘यलो अलर्ट’ तर रायगड, रत्नागिरीत 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. दरम्यान, २२ ते २५ जुलैदरम्यान समुद्रात ४.७२ मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे समुद्रकिनारे, चौपाट्यांवर जाऊ नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

जून महिन्यात पाठ फिरवलेल्या पावसाची आता मुंबई, ठाणे, पालघर, कोकणपट्ट्यात कृपादृष्टी झाली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुंबई परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. शनिवारी रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाचा रविवारी सकाळपासून जोर वाढला. मुंबई शहर व उपनगराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. कोकणपट्ट्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भाग जलमय झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

चार दिवस समुद्रात उंच लाटा उसळणार

सोमवार, २२ जुलै - दुपारी १२.५० वा. - ४.५९ मीटर

मंगळवार, २३ जुलै - दुपारी ०१.२९ वा. - ४.६९ मीटर

बुधवार, २४ जुलै - दुपारी ०२.११ वा. - ४.७२ मीटर

गुरुवार, २५ जुलै - दुपारी ०२.५१ वा. - ४.६४ मीटर

रविवारी ३६ विमाने रद्द

मुंबईत रविवारी १० तासांत १०० मिमी पाऊस पडला. सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पूर्व व पश्चिम उपनगरात अनुक्रमे ११८ मिमी व ११० मिमी पाऊस झाला. या पावसामुळे मुंबई विमानतळावरून सुटणारी ३६ विमाने रद्द करण्यात आली.

रविवारी पडझडीच्या घटना

मुंबई शहर व उपनगरात १९ ठिकाणी झाड, झाडांच्या फांद्या कोसळल्या. शहर व पश्चिम उपनगरात ६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना. शहर व उपनगरात घर व घराचा भाग कोसळण्याच्या ८ घटना.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन