अखेर मुंबईतील विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा मुहूर्त ठरला; गाळ काढणे, स्वच्छता व पाणी साठवण टाक्या उभारणार, प्रत्येक वॉर्डला ३० लाखांचा निधी संग्रहित छायाचित्र
मुंबई

अखेर मुंबईतील विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा मुहूर्त ठरला; गाळ काढणे, स्वच्छता व पाणी साठवण टाक्या उभारणार, प्रत्येक वॉर्डला ३० लाखांचा निधी

निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची व आगामी काळात पाणी टंचाईची चिंता सतावत असताना, मुंबई महापालिकेने अखेर शहरातील विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी पावले उचलली आहेत.

गिरीश चित्रे

मुंबई : एल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची व आगामी काळात पाणी टंचाईची चिंता सतावत असताना, मुंबई महापालिकेने अखेर शहरातील विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी पावले उचलली आहेत. मुंबईतील विहिरींची स्वच्छता, गाळ उपसा आणि दुरुस्ती करून त्यांचा वापर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक वॉर्डला ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली आहे. त्यानंतर जल अभियंता विभागाने सात परिमंडळांतील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि संबंधित जल अभियंत्यांना परिपत्रक जारी करून कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत.

या योजनेंतर्गत प्रत्येक वॉर्डमध्ये गरजेनुसार पाच खुल्या विहिरींची निवड करण्यात येणार आहे. या विहिरींमधील गाळ आणि कचरा काढणे, स्वच्छता करणे तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे केली जातील. विहिरींमधील पाण्याचा उपयुक्त साठा वापरता यावा, यासाठी पंप बसवण्यात येणार आहेत तसेच विहिरींच्या शेजारी ५ हजार लिटर क्षमतेच्या पाणीसाठवण टाक्या उभारण्यात येणार आहेत. यामधील पाणी टँकरच्या माध्यमातूनही गरजू भागांमध्ये पुरवता येणार आहे.

आदेश एप्रिलमध्ये, प्रत्यक्ष कामांचा मुहूर्त ऑक्टोबरचा

मुंबईतील विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा विषय नवीन नाही. कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी एप्रिल २०२६ मध्येच शहरातील विहिरींची कार्यक्षमता तपासून तातडीने कार्यान्वित करता येणाऱ्या विहिरी सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर ११ जून २०२६ रोजी आयुक्त अश्विनी भिडे यांनी जल अभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विहिरींमधील गाळ आणि कचरा काढणे, स्वच्छता करणे तसेच पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणाची व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या निर्देशांनंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणीला ऑक्टोबर उजाडला. पाणीटंचाईचा धोका लक्षात घेता विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी आधीच नियोजन करून कामे सुरू करणे अपेक्षित होते. आता निधी मंजूर झाल्यानंतर ही योजना प्रत्यक्षात किती वेगाने राबवली जाते, किती विहिरी कार्यान्वित होतात आणि त्यातून किती पाणी उपलब्ध होते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

पुनरुज्जीवितासाठी विहिरींची निवड करणार

विहिरींमधील पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी केला जाणार आहे. चाळी, झोपडपट्टया, उंचावरील वस्त्या आणि मोठ्या निवासी सोसायट्यांमध्ये पाण्याची गरज लक्षात घेऊन पुनरुज्जीवित विहिरींची निवड करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे पिण्यायोग्य पाण्यावरील बिगरपिण्याच्या कामांचा भार कमी करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी मंजूर निधी अपुरा पडल्यास आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या मंजुरीने अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद

घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको; खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र, सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी

५ हजारांचे मूल्य कसे समजणार? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Mumbai : पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; दुर्गामूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई