मुंबई

बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पालिकेने दिला ‘आधार’

बेस्ट उपक्रमाच्या विद्युत व परिवहन विभागात ४२ हजार कर्मचारी कार्यरत होते

प्रतिनिधी

आर्थिक कोंडीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटीसह अन्य थकीत रक्कम देण्यासाठी मुंबई महापालिकेने ४५० कोटींचे अर्थसहाय्य केले आहे. पालिकेच्या आर्थिक मदतीमुळे बेस्ट उपक्रमातील ३,५१६ निवृत्त कर्मचाऱ्यांना पालिकेचा आधार मिळाला आहे. दरम्यान, ४५० कोटींचे अर्थसहाय्य केले असून, देण्यात आलेल्या अर्थसहाय्याचा अहवाल तीन महिन्यांत सादर करणे अनिवार्य असल्याचे मुंबई महापालिकेच्या लेखापाल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. तसेच मुंबई महापालिकेने बेस्ट उपक्रमास आतापर्यंत ५,३२१.२७ कोटींचे अर्थसहाय्य दिले आहे.

बेस्ट उपक्रमाच्या विद्युत व परिवहन विभागात ४२ हजार कर्मचारी कार्यरत होते; परंतु सेवानिवृत्त होत सद्य:स्थितीत बेस्ट उपक्रमात २९ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती खालावली आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युइटीसह अन्य देय देण्यासाठी बेस्ट उपक्रमाला पालिकेने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी मुंबई महापालिकेने ५,३२१ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे; मात्र २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत ३,५१६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिकेकडे ४५० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मागितले होते. त्यानुसार प्रस्तावाला प्रशासकीय अधिकारी म्हणून पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. पालिकेच्या आर्थिक मदतीमुळे बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विविध देणी लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘अशी’ केली आर्थिक मदत

बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन, सन २०१९-२०पासून ते सन २०२२-२३ (२१ ऑगस्ट २०२२)पर्यंत करण्यात आलेल्या तरतुदींमधून २१४१.०५ कोटी व तरतुदींव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान, रक्कम म्हणून २० ऑगस्ट २०२२पर्यंत ३१८०.२२ कोटी असे एकूण ५३२१.२७ कोटींचे अधिदान बेस्ट उपक्रमास करण्यात आले आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक