अमित श्रीवास्तव/मुंबई
‘एनएबीएल’ मान्यताप्राप्त निदानात्मक प्रयोगशाळांमधील बोगस पॅथॉलॉजिस्टची चौकशी केली जाणार आहे, असा निर्णय एनएबीएलने घेतला आहे.
केंद्राकडे जाहीर तक्रारीनंतर, राष्ट्रीय चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळा मान्यता मंडळाने (एनएबीएल) म्हटले आहे की, अंदमान आणि निकोबार बेटांवरील पोर्ट ब्लेअर येथील सल्लागार पॅथॉलॉजिस्ट डॉ. अनन जयस्वाल यांनी दाखल केलेल्या या तक्रारीत ‘बोगस पॅथॉलॉजिस्ट’च्या पद्धतशीर चालणाऱ्या गैरप्रकाराचा आरोप करण्यात आला आहे. यात प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल पात्र पॅथॉलॉजिस्टच्या नावावर जारी केले जातात. जे प्रयोगशाळेच्या कामकाजात प्रत्यक्ष उपस्थित नसतात किंवा सक्रियपणे देखरेख करत नसतात.
तक्रारीत म्हटले की, काही पॅथॉलॉजिस्ट इतर ठिकाणी पूर्णवेळ नोकरीवर असतानाही, एकाच वेळी वेगवेगळ्या शहरांतील अनेक प्रयोगशाळांसाठी अधिकृत स्वाक्षरीकर्ता म्हणून काम करत आहेत. यामुळे रुग्णांची सुरक्षा, एनएबीएल मान्यतेची विश्वासार्हता आणि ‘आयुष्मान भारत’, ‘सीजीएचएस’ व ‘ईसीएचएस’सारख्या सरकारी आरोग्य योजनांमधील सार्वजनिक निधीचा संभाव्य गैरवापर यावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
१७ एप्रिल रोजी सादर करण्यात आलेली आणि ३ जुलै रोजी भारतीय गुणवत्ता परिषदेकडे वर्ग करण्यात आलेल्या या तक्रारीत प्रसारमाध्यमांच्या अहवालांचा दाखला देण्यात आला आहे. यामध्ये ‘द फ्री प्रेस जर्नल’च्या तपास अहवालांचा समावेश आहे, ज्यामध्ये प्रयोगशाळा पॅथॉलॉजिस्टच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय त्यांची नावे आणि डिजिटल स्वाक्षऱ्या वापरून अहवाल जारी करत असल्याचे उघड झाले होते.
तक्रारदाराने एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळांचे, सरकारी आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या प्रयोगशाळांचे, पॅथॉलॉजिस्टची प्रत्यक्ष उपस्थिती आणि सक्रिय सहभाग तपासण्यासाठी जोखीम-आधारित ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
क्यूसीएलने म्हटले की, आयएसओ १५१८९ अंतर्गत ‘एनएबीएल’चे मान्यता फ्रेमवर्क हे स्पष्ट करते की मान्यताप्राप्त वैद्यकीय प्रयोगशाळांनी चाचणी निकालांची तपासणी, प्रमाणीकरण, अधिकृतता आणि अहवाल तयार करताना पॅथॉलॉजिस्टसह अधिकृत स्वाक्षरीकर्त्यांची उपलब्धता, प्रत्यक्ष उपस्थिती आणि सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
२१६५ शाखा मान्यताप्राप्त
भारतात अंदाजे ३ लाख निदानात्मक प्रयोगशाळा आहेत, परंतु त्यापैकी केवळ २,१६५ प्रयोगशाळा ‘एनएबीएल’ मान्यताप्राप्त आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांचे पालन सुनिश्चित होते.