मुंबई : महापालिका निवडणुकींसाठी मतदान सुरू असताना मतदान प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मतदानानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई सहजपणे पुसता येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीतील मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे यांनी शाई लगेच पुसल्याचा दावा केला आणि "मतदानासाठी बोटाला लावलेली शाई जर लगेच पुसली जात असेल, तर हा काय प्रकार आहे? जर असेच गैरप्रकार करायचे असतील तर निवडणुका घेता कशाला?" असा संतप्त सवाल उपस्थित करत मतदान केंद्रावर धाव घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर, काँग्रेसच्या सचिन सावंत यांनीही हाच आरोप करत व्हिडिओ बनवून थेट प्रात्यक्षिकच दाखवले आहे.
पत्नीच्या बोटावरील शाईसुद्धा नेलपॉलिश रिमूव्हरने सहज निघाली
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मतदानानंतर बोटावर मार्कर पेनने लावण्यात येणारी शाई सहजपणे पुसता येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पत्नीच्या बोटावरील शाईसुद्धा नेलपॉलिश रिमूव्हरने सहज निघाली, असा दावाही त्यांनी केला आहे. याद्वारे बोगस मतदानाचा धोका वाढतो असे ते म्हणाले.
शाईची टेस्टींग कोणी केली?
मतदान केल्यानंतर, "मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नेलपॉलिश रिमुव्हरने बोटावरची शाई जाते याचे हे प्रात्यक्षिक..." असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. "राज्य निवडणूक आयोगाकडून यावेळी प्रचंड गैरव्यवस्थापन झाले आहे. हा प्रकार दुर्दैवी आहे. शाईची टेस्टींग कोणी केली? अगोदरच काळजी घेतली नव्हती का?" असे सवाल उपस्थित करत अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणावर फ्री प्रेस जर्नलशी बोलताना त्यांनी निवडणूक यंत्रणेवर गंभीर आरोप केले. “निवडणूक प्रक्रियेत अनेक अनियमितता सुरू आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असून याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
बघा व्हिडिओ
दरम्यान, या आरोपांवर निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.