नालासोपारा : एका कुत्र्याला मारहाण केल्यावरून झालेल्या वादाचं रूपांतर मोठ्या हल्ल्यात झाल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. नालासोपारा पूर्वेतील श्रीराम नगर परिसरात सोमवारी (दि. २) रात्री सुमारे ५० जणांच्या जमावाने घरांवर हल्ला केला. हातात लाठ्या आणि लोखंडी सळ्या घेऊन आलेल्या जमावाने घरांच्या खिडक्या, दरवाजे आणि वाहनांची तोडफोड केली. या हल्ल्यात सुमारे ३० ते ३५ घरांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
नेमकं काय घडलं?
रविवारी (दि. १) रात्री संतोषभुवन परिसरात राहणारा रितेश दुबे हा श्रीराम नगरमधून जात होता. त्यावेळी त्याने गल्लीतील एका कुत्र्याला लाथ मारल्याचं सांगण्यात येत आहे. यावरून परिसरातील काही जणांनी त्याला जाब विचारला. त्यानंतर झालेल्या वादात रितेशला मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी रात्री जमावाने श्रीराम नगरमध्ये हल्ला केल्याची माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.
घरांवर हल्ला, वाहनांची तोडफोड
सोमवारी रात्री सुमारे ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास जमाव श्रीराम नगरमधील चाळींच्या परिसरात घुसला. हल्लेखोरांच्या हातात लाठ्या, लोखंडी रॉड आणि सळ्या होत्या. त्यांनी घरांवर दगडफेक करत तोडफोड सुरू केली.
या हल्ल्यात घरांच्या खिडक्यांच्या काचा, दरवाजे, वीजमीटरचे बॉक्स आणि पाण्याचे ड्रम फोडण्यात आले. परिसरात उभ्या असलेल्या दुचाकी आणि इतर साहित्याचंही नुकसान झालं. माहितीनुसार, श्रीराम नगरमधील ८ ते ९ चाळींमधील सुमारे ३० ते ३५ घरांचं नुकसान झालं आहे.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रहिवासी घाबरले. काही कुटुंबांनी भीतीपोटी घरांना कुलूप लावून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतल्याचंही वृत्त आहे. मात्र, या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
४० जणांविरोधात गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी परिसराची पाहणी केली. त्यानंतर श्रीराम नगरमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
माध्यामांनी दिलेल्या वृत्तानुसार, पेल्हार पोलिसांनी राजवीर सरदार, रणवीर सरदार, निलेश गुप्ता यांच्यासह सुमारे ४० जणांविरोधात दंगल, धमकी, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात असून, हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.