Mumbai : नालासोपाऱ्यात ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; भाविक थोडक्यात बचावले, Video (Photo-X)
मुंबई

Mumbai : नालासोपाऱ्यात ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; भाविक थोडक्यात बचावले, Video

स्थानिकांच्या मदतीने गणेशमूर्ती उचलून तिच्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : नालासोपारा पश्चिमेकडील यशवंत गौरव परिसरात शनिवारी (दि. १२) सायंकाळी अचानक आलेल्या पावसात गणेशमूर्तीवर प्लास्टिक टाकत असताना ट्रॉली उलटली आणि गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली. या दुर्घटनेत मूर्तीखाली चार ते पाच गणेशभक्त अडकले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत त्यांची सुखरूप सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पावसात मूर्तीवर प्लास्टिक टाकताना दुर्घटना

नालासोपारा पश्चिमेकडील यशवंत गौरव परिसरात शनिवारी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गणेशमूर्ती कार्यशाळेतून मंडळाच्या ठिकाणी घेऊन जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली.

पावसापासून मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी काही गणेशभक्त मूर्तीला प्लास्टिकने झाकट कव्हर टाकत होते. याचदरम्यान मूर्ती ठेवलेली ट्रॉली असंतुलित झाली. त्यामुळे मूर्ती एका बाजूला झुकली आणि अचानक खाली कोसळली.

मूर्तीखाली भाविक अडकले

मूर्ती कोसळल्यानंतर चार ते पाच गणेशभक्त मूर्तीखाली अडकल्याचे समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये मूर्तीखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी नागरिक मदत करताना दिसत आहेत.

नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास वळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, कोणालाही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने गणेशमूर्ती उचलून तिच्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मूर्ती सुरक्षित करून मंडळाच्या ठिकाणी नेण्यात आली. दरम्यान, या दुर्घटनेत गणेशमूर्तीचेही मोठे नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुंबईत पावसाची हजेरी

दरम्यान, मुंबई आणि परिसरात रविवारी अचानक मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून कोरडे वातावरण असताना पाऊस झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. हवामान विभागाने मुंबई आणि महानगर परिसरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटादरम्यान नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गणेशोत्सवासाठी BMC सज्ज; महापौर, उपमहापौरांकडून विसर्जनस्थळांची पाहणी

Ulhasnagar : बाप्पा येणार... पण खड्ड्यांतूनच? महापौरांचा संकल्प गेला खड्ड्यात! अजूनही विघ्न कायम; नागरिकांचा संतप्त सवाल

Pune : पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा; वाजत-गाजत निघणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आगमन मिरवणूक

बदलापुरात सुरू होणार शेतकरी आठवडे बाजार; पूर्व-पश्चिम भागात चार ठिकाणी बाजारपेठ

Thane : गणरायाच्या सुरक्षेसाठी मंडळे सज्ज! मोठ्या मूर्तीना पट्ट्यांचा आधार; खड्डेयुक्त रस्त्यांची खरी अडचण