मुंबई : कमी अंतराच्या प्रवासाला नकार देणाऱ्या तसेच वाहनांच्या निश्चित क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केल्याप्रकरणी शहरातील जवळपास ५० हजार टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. तर, २८,८१४ टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालकांचा परवाना कमी अंतराचे भाडे नाकारल्यामुळे रद्द केला जाणार आहे.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने १८ एप्रिल ते २ मे या कालावधीत चुकीच्या टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवली होती. या दरम्यान वाहतूक उल्लंघनांसाठी ४८,४१७ टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांना चलन जारी करण्यात आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
४०.२५ लाख रुपयांचा दंड वसूल
या कारवाईत योग्य गणवेश न घालता किंवा वैध परवाने, बॅज किंवा नोंदणी कागदपत्रे न बाळगता वाहने चालवताना आढळलेल्या टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांचा समावेश होता. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ४८,४१७ ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून ४०.२५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
२८,८१४ चालकांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू
कमी अंतराच्या प्रवासांना नकार देणाऱ्या २८,८१४ टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालकांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.